Marathi News> विश्व
Advertisement

दुसऱ्या महायुद्धातील विमानांची हवेत धडक, एअर शोदरम्यान भयानक अपघात; पाहा व्हिडिओ

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे

दुसऱ्या महायुद्धातील विमानांची हवेत धडक, एअर शोदरम्यान भयानक अपघात; पाहा व्हिडिओ

दुसऱ्या महायुद्धाने (World War 2) जगाला अनेक दुःखद आठवणी दिल्या आहेत. जगभरात अनेक ठिकाणी या आठवणी आजही जपल्या जात आहेत. यामध्ये काही युद्ध सामग्रीचाही समावेश आहे. अमेरिकेत (US) दुसऱ्या महायुद्धातील विमाने अद्यापही चांगल्या अवस्थेत आहेत. अशाच दुसऱ्या महायुद्धातील दोन विमानांचा (vintage warplanes) अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या टेक्सास (texas) राज्यात दोन जुनी लढाऊ विमाने एकमेकांवर आदळली असून या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) दिलेल्या माहितीनुसार, टेक्सासमधील डलास शहरात एअर शोदरम्यान (Air Show) ही घटना घडली.

एअर शोदरम्यान दुसऱ्या महायुद्धाची दोन विमाने एकमेकांवर आदळली. या घटनेनंतर दोन्ही विमाने कोसळली आणि आग लागली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अँथनी मोंटोया यांनी दोन्ही विमाने एकमेकांना धडकताना पाहिली. आकाशात दोन विमाने आदळल्याचे त्याने पाहिले. मी पूर्ण शॉकमध्ये गेलो आणि असा प्रकार घडला यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी माझ्या मित्रासोबत एअर शोसाठी गेलो होतो. विमाने आदळताच सर्वत्र गोंधळ उडाला आणि काही लोक ओरडत होते, असे अॅंथनी मोंटोया म्हणाले.

हवेत जोरदार धडक

या दुर्घटनेनंतर विमानातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या डझनहून अधिक गाड्यांना बोलवण्यात आले. ही घटना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.20 च्या सुमारास घडली. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार, बोइंग बी-17 फ्लाइंग फोर्ट्रेस आणि बेल पी-63 किंगकोब्रा या विमानांची जोरदार टक्कर झाली. हवेत आदळल्यानंतर दोन्ही विमाने जमिनीवर पडली. या घटनेनंतर डॅलस एक्झिक्युटिव्ह विमानतळावर गोंधळ उडाला.

बचावकार्य सुरु

घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. त्याचवेळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही विमाने एकमेकांवर आदळल्यानंतर जमिनीवर कशी पडली हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर या विमानांना आग लागली.

अपघातग्रस्त विमाने कशी होती?

दुसऱ्या महायुद्धात चार इंजिन असलेल्या B-17 बॉम्बरने मोठी भूमिका बजावली होती. त्याच वेळी, पी-63 किंगकोब्राची निर्मिती बेल एअरक्राफ्टने केली होती. हे फक्त सोव्हिएत हवाई दलाने वापरले होते.

Read More