Marathi News> विश्व
Advertisement

मुस्लिमांच्या हक्कांसाठी तुमचं सरकार काय करतं? पत्रकाराच्या प्रश्नावर मोदी म्हणाले, "मला आश्चर्य..."

PM Modi On Muslim Rights In India: पंतप्रधान मोदींना थेट मुस्लिमांचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला. मात्र हा प्रश्न विचारताना महिला पत्रकाराने केलेला भारताचा उल्लेख मोदींना खटकला.

मुस्लिमांच्या हक्कांसाठी तुमचं सरकार काय करतं? पत्रकाराच्या प्रश्नावर मोदी म्हणाले,

PM Modi On Muslim Rights In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी (अमेरिकी स्थानिक वेळेनुसार) व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी झिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभाला हजेरी लावली. या डीनरआधी मोदी आणि बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर दिली. यामध्ये दहशतवाद, दोन्ही देशांचा विकास, अवकाश मोहिम यासारख्या अनेक गोष्टींबद्दल दोन्ही नेत्यांनी भाष्य केलं. मात्र यावेळेस पंतप्रधान मोदींना भारतामधील लोकशाही आणि मुस्लिम समाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुमचं सरकार अल्पसंख्यांकांसाठी काय करतंय असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला असता त्यांनी भारतीय लोकशाही, संविधानाचा संदर्भ देत सविस्तर उत्तर दिलं.

मोदींना तो उल्लेख खटकला

"तुम्ही आणि तुमचं सरकार अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांच्या हक्कांसाठी तसेच त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी काय करत आहात?" असा प्रश्न एका महिला पत्रकाराने पंतप्रधान मोदींना विचारला. हा प्रश्न विचारताना या महिलेने 'भारतात लोकशाही आहे असं म्हणतात,' असा उल्लेख केला होता. हाच उल्लेख मोदींना खटकला. "मला आश्चर्य वाटलं की तुम्ही, लोक म्हणतात असं म्हणत भारताच्या लोकशाहीचा संदर्भ दिला. पण लोक म्हणतात असं नाही तर भारत हा लोकशाही देशच आहे," असं मोदी म्हणाले. तसेच पुढे बोलताना मोदींनी, "राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सांगितल्याप्रमाणे, भारत आणि अमेरिका दोन्ही देशांच्या डीएनमध्ये लोकशाही आहे. लोकशाही हा आपला आत्म आहे. लोकशाही आपल्या नसानसांमध्ये भिनलेली आहे. आम्ही लोकशाही जगतो," असंही म्हटलं.

सरकार कसं काम करतं हे ही सांगितलं

"आमच्या पूर्वजांनी लोकशाहीला शब्दरुप देत संविधान तयार केलं आहे. आमचं सरकार लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा आधार घेऊन तयार केलेल्या संविधानाच्या आधारावर काम करते. आमच्या संविधान आणि आमचं सरकार याच दिशेने काम करतंय. आम्ही सिद्ध केलं आहे की लोकशाहीच्या माध्यमातून देशाचा कारभार चालू शकतो. जात, वंश, धर्म, लिंगाच्या आधारावर कोणत्याच भेदभावाला लोकशाहीमध्ये जागा नसते. लोकशाहीबद्दल आपण बोलतो तेव्हा मानवी मुल्यांना किंमत नसेल, मानवतेला किंमत नसेल, मानवी हक्कांना स्थान नसेल तर ती लोकशाही नाही. त्यामुळेच तुम्ही जेव्हा लोकशाहीबद्दल बोलता, लोकशाही स्वीकारल्याचं सांगता आणि लोकशाहीमध्ये जगता तेव्हा भेदभाव करण्याचा काही विषयच नसतो. त्यामुळेच भारत सब का साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मूलभूत सिद्धांताच्या आधारे काम करतो," असं मोदींनी त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामासंदर्भात माहिती देताना सांगितलं.

नक्की वाचा >> "हाततल्या ग्लासात दारु नसेल तर..."; बायडेन यांचं विधान ऐकून मोदींना हसू अनावर; पाहा Video

 

सरकारी सवलतींचा सर्वांना समान फायदा

तसेच भारतामधील सरकारी सवलतींचा फायदा सर्वांना समानपद्धतीने दिला जातो असंही मोदींनी यावेळेस अधोरेखित केलं. "भारतामध्ये सकारकडून देण्यात येणाऱ्या सवलती सर्वांना मिळतात. जे यासाठी पात्र ठरतात सर्वांना सवलती दिल्या जातात. त्यामुळेच भारतीय लोकशाहीच्या मुल्यांमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. जात, धर्म, वयाच्या आधारे किंवा कुठून ती व्यक्ती आली याच्या आधाराव भेदभाव केला जात नाही," असंही मोदींनी अमेरिकी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

Read More