Marathi News> विश्व
Advertisement

इमरान खान यांच्याकडून नरेंद्र मोदींची 'कॉपी'? पाक जनतेसाठी महत्त्वाचा संदेश

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा २ मिनिट ७ सेकंदाचा व्हिडिओ प्रसिद्ध

इमरान खान यांच्याकडून नरेंद्र मोदींची 'कॉपी'? पाक जनतेसाठी महत्त्वाचा संदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानची अर्थव्यवस्था एका मोठ्या संकटातून प्रवास करतेय. डॉलरच्या किंमतीत बोलायचं तर पाकिस्तानचे १५० रुपये म्हणजे एक डॉलर... इथवर वेळ येऊन पोहचलीय. महागाईनं नागरिकांना हैराण करून सोडलंय. पंतप्रधान इमरान खान यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न आणि आव्हान आहे ते पाकिस्तानची अर्थव्यवस्था सावरण्याचं... ३० मे रोजी रात्री १० वाजता इमरान खान यांनी आपल्या पक्षाच्या 'पाकिस्तान तहरीक ए इन्साफ' (पीटीआय) च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटनरून एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओद्वारे ते पाकिस्तानच्या नागरिकांना आयकर भरण्याचा आणि बेहिशोबी संपत्तीचा खुलासा करण्याची विनंती करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान हे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची कॉपी तर करत नाहीत ना? असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर इमरान खान लवकरच मोदींप्रमाणे काळ्याधनाविरुद्ध नोटाबंदीसारखा कठोर निर्णय घेऊ शकतात, असंही म्हटलं जातंय. 

पाकिस्तानची लोकसंख्या २२ करोड आहे आणि केवळ १ टक्के लोक आयकर भरतात. नागरिकांनी आयकर भरल्याशिवाय कोणत्याही देशाच्या सरकारला आपल्या देशाला पुढे घेऊन जाणं शक्य नाही, असं इमरान खान या २ मिनिट ७ सेकंदाच्या या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. 

३० जूनपूर्वी आपल्या बेहिशोबी संपत्तीचा खुलासा करण्याचं आणि आयकर भरण्याचं आवाहनही त्यांनी आपल्या देशातील नागरिकांना केलं आहे. चौकशी समितीकडे बेहिशोबी मालमत्तांची आणि काळं धन कुठे-कुठे आहे याची माहिती उपलब्ध असल्याचीही त्यांनी तंबी दिलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, अशाच पद्धतीनं भारतीयांना आवाहन केल्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. लगोलग देशातील ५०० आणि १००० च्या नोटा बंद करत २००० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या. इमरान खान यांनीही अशाच पद्धतीनं आवाहन केल्यानंतर आता पाकिस्तानातही ५००, १००० च्या नोटांशिवाय ५००० रुपयांच्या नोटांवर टाच येणार का? असा प्रश्न अनेकांना पडलाय.   

Read More