Marathi News> विश्व
Advertisement

नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या भरपगारी सुट्ट्यांचा वापर न करणं तुमच्यासाठी घातक

तज्ज्ञांच्या निरिक्षणानुसार हे सिद्ध होत आहे की....  

नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या भरपगारी सुट्ट्यांचा वापर न करणं तुमच्यासाठी घातक

मुंबई : उठा... चला... कामं करा.... घरी जा... कामं करा आणि  पुन्हा तेच.... हे असं चक्र सुरु असतानाच याला कधी आपण नकळतपणे दिनचर्येचं नाव देतो. वयाच्या अमुक एका टप्प्यापर्यंत शिक्षण, मग नोकरी आणि मग कुटुंब अशा जबाबदाऱ्यांची आखणी करताना आणि बँकेची खाती भरताना आपण, पगाराच्या वाटा या नवं घर किंवा मग कोणत्या एका गुंतवणुकीच्या योजनेकडे वळवतो. या साऱ्यामध्येच संगणकापुढे मान झुकवून काम करत असताना अनेकदा आपण स्वत:लाही विसरुन जातो. हे कोणाचं भाकित नाही, तर अनेक तज्ज्ञांच्या निरिक्षणातून ही महत्त्वाची बाब सिद्ध झाली आहे. 

स्वत:कडे दुर्लक्ष होण्याच्या या घटना जोडल्या गेल्या आहेत नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या सुट्ट्यांशी. अनेकदा सुट्टी मिळेल की नाही, बरं मिळालीच तर नोकरीच्या ठिकाणी असणारी आपली पकड सैल होईल म्हणून सुट्टी न घेतलेलीच बरी किंवा मग नोकरीच्या ठिकाणी होणारे वाद टाळण्यासाठीही याकडे नोकरदार वर्ग दुर्लक्ष करतो. पण, मुळात सुट्टी न घेतल्यामुळे कामाच्या ठिकाणी असणारा तुमचा दर्जा खालवू शकतो. त्यामुळे एका अर्था नोकरीच्या ठिकाणी ही बाब घातकही ठरु शकते. 

'कर्ली टेल्स'च्या वृत्तानुसार इंडियाना विद्यापीठात आरोग्य विषय हाताळणाऱ्या डॉ. रेबेक्का गिल्बर्ट यांच्या निरिक्षणानुसार कामाच्या व्यापातून उसंत घेण्यासाठी स्वत:ला स्वत:चीच परवानगी देणं महत्त्वाचं असतं. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिळणाऱ्या भरपगारी सुट्टीचा वापर न करता हे चक्र अशाच पद्धतीने सुरु ठेवल्यास तणावाखाली येऊन याचे थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात. 

सुट्टीवर गेल्यानंतर आपल्या कारकिर्दीवर याचा परिणाम होईल असाच अनेकांचा समज असतो. पण, मुळात कमी तणावाखाली नसताना अधिक चांगल्या आणि परिणामकारक पद्धतीने काम करता येतं हेसुद्धा त्यांनी सिद्ध केलं. कामाच्या व्यापातून वेळ काढत सुट्टीवर जाण्याचे आणखीही बरेच फायदे आहेत. तुमच्या दैनंदिन जीवनशैलीतून बाहेर येणं, एका नव्या धाटणीचं आयुष्य जगणं, नव्या पदार्थांची चव चाखणं, नव्या लोकांना भेटणं अशा अनेक मार्गांनी तुम्ही स्वत:मध्ये काही सकारात्मक बदल घडवू शकता. यादरम्यान, तुम्ही तुमच्यातीलच बदल जाणत पुढच्या वाटचालीसाठी या सर्व गोष्टी तुम्हाला फायद्याच्या ठरतील. त्यामुळे सुट्टीच्या दिवसाचा वापर हा फिरण्यासाठी करण्याचा सल्ला डॉ. गिल्बर्ट यांनी दिला.  

भारतीय याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? 

मागील वर्षी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार सुट्ट्यांचा वापर न करण्यामध्ये भारतीय अग्रस्थानापासून दूर नाहीत. सुट्टी मागण्यास त्यांना अनेकदजा संकोचलेपणा वाटतो. कामापासून दूरावलं जाण्याची भीती, कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचा इतरांच्या मनात येणारा गैरसमज आणि सुट्टीची योग्य ती आखणी न करणं अशा अनेक गोष्टी भारतीयांच्या या सुट्ट्यांच्या आड येतात. किंबहुना अनेकदा सुट्टी घेऊनही ती घेतल्याचा संकोटलेपणाही भारतीयांचं मन खात असतो. जी बाब बऱ्याच अंशी चुकीची ठरते. 

विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

मानसिक शांतता, स्थैर्य आणि आनंदाचे काही क्षण मिळवण यावर प्रत्येकाचाच हक्क आहे. मुळात याच अनुषंगाने अनेक मोठमोठ्या कंपन्यांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी उपक्रम राबवण्यात येतात. कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकाची आणि पगाराची आखणी करत असताना मानवी गरज म्हणून त्यांच्या सुट्ट्यांचाही रितसर विचार करण्यात येतो. त्यामुळे भरपगारी सुट्ट्या या फक्त कागदोपत्री तरतुदीपुरताच नव्हे तर, जीवनातील काही सुरेख आणि अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घेण्यासाठीही देण्यात येते, ज्याचा थेट संपर्क हा आरोग्याशी आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रगतीशी निगडीत असतो हे दुर्लक्षित करु नका.

Read More