Marathi News> विश्व
Advertisement

पाहा, कोरोनाच्या दहशतीत इटलीमध्ये असा सुरु आहे जगण्याचा 'सुरेल' संघर्ष

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

पाहा, कोरोनाच्या दहशतीत इटलीमध्ये असा सुरु आहे जगण्याचा 'सुरेल' संघर्ष

मुंबई : Corona व्हायरचा प्रादुर्भाव जगभरात झपाट्याने पसरु लागला आहे. चीन, इराण, इटली या देशांमागोमाग भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. एकिकडे जगभरात कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येक देशाकडून काही कठोर असे प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात येत आहेत. ज्यामध्ये गर्दीची ठिकाणं जाणीवपूर्वकपणे टाळण्याचा सल्ला वारंवार देण्यात येत आहे. इटली या देशाने तर, जगाशीच संपर्क तोडला आहे. 

'लॉकडाऊन' झालेल्या या देशातील नागरिकांना गरज असल्यास काही प्रसंग वगळता इतर वेळेस घराबाहेरही न पडण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, संग्रहालयं असे अनेक दैनंदिन व्यवहारही बंद ठेवण्याचा निर्णय़ या राष्ट्रात घेण्यात आला आहे. एकिकडे कोरोनासी लढणाऱ्या इटली प्रशासनाकडून शक्य ती सर्व पावलं उचलण्यात येत आहेत. तर, दुसरीकडे येथेच कोरोनाच्या दहशतीत असतानाही तेथील नागरिकांनी जगण्याचा एक सुरेल संघर्ष सुरु केला आहे. हा संघर्ष तणावाच्या परिस्थितीतही नागरिकांना सकारात्मकतेची जाणीव करुन देत आहे. 

सोशल मीडियावर इटलीतील सध्याच्या घडीचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी इटली येथे पाहायला मिळणारं हे वातावरण दाद देण्याजोगं असल्याचं म्हणत त्याविषयीचे काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. straitstimesच्या वृत्तानुसार या व्हिडिओमध्ये नागरिक त्यांच्या घरांच्या बाल्कनीमध्ये येऊन  "Canto della Verbena" अशी समुहगीतं गाताना दिसत आहेत.  "long live our Siena!" असे शब्दही ते गात आहेत. 

इतकंच नव्हे तर, काही नागरिक स्थानिक भाषेतील गीतंही गाताना दिसत आहेत. शिवाय राष्ट्रगीतांची धुनही काहींनी गुणगुणली आहे. शुक्रवारपासूनच सोशल मीडियावर हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळे नागरिकांना विविध दिवशी विविध गीतं म्हणण्याची ही कल्पना सुचली आणि ती अंमलातही आणली जात आहे, असं म्हटलं जात आहे. 

एकिकडे कोरोनाचा विळखा चिंतातूर करत असतानाच इटलीच्या नागरिकांचे हे व्हिडि पाहताना दहशतीच्या या वातावरणात एक सकारात्मक आशेचा किरण नक्कीच मिळत आहे, हे नाकारता येणार नाही. 

 

Read More