Marathi News> पश्चिम महाराष्ट्र
Advertisement

अश्लिल मेसेज, अपहरण अन् कालव्यात सापडला मृतदेह; सांगलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ

Sangli Crime : सांगलीत एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करत त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळं सांगलीत खळबळ उडाली आहे.

अश्लिल मेसेज, अपहरण अन् कालव्यात सापडला मृतदेह; सांगलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ
Updated: Oct 11, 2023, 01:37 PM IST

सर्फराज मुसा, झी मीडिया, सांगली :  व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) अश्लील मेसेज पाठवत असल्याच्या रागातून सांगलीत (Sangli Crime) एका तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल आठ दिवसांनी या तरुणाचा मृतदेह सापडल्याने त्याच्या आईने हंबरडा फोडला. पोलिसांनी (Sangli Police) याप्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. दरम्यान, या घटनेमुळ सांगलीत खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याच्या कारणातून सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील एका तरुणाचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सुशील आठवले (वय 23) असे या मृत तरुणाचं नाव असून याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाच्या हत्येनंतर तब्बल आठ दिवसांनी तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. सुशीलचा मृतदेह सापडताच घरच्यांनी एकच आक्रोश केला.

दहा दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ शहरातील सुशील आठवले हा तरुण बेपत्ता झाला होता. त्यानंतर पोलिसांनी पाच तरुणांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. या पाचही तरुणांनी सुशील याचा खून करत मृतदेह म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यात टाकून दिल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांच्याकडून मृतदेह शोधण्याचे काम सुरू होतं. अखेर आठ दिवसानंतर लंगरपेठ येथील कालव्यात सुशील याचा मृतदेह आढळून आल्याने खुनाचा प्रकार समोर आला.

दरम्यान, या प्रकरणी मेघा आठवले यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कवठेमहांकाळ येथील चैतन्य नामदेव माने, सुनिल मारुती माने या दोघांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीसांसमोर हजर होत आपण सुनील याचा खून केला असल्याची कबुली दिली. चैतन्य नामदेव माने व सुनिल मारुती माने यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीसांनी कवठेमहांकाळ पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी अनुज अमृत माने, अनिल मारुती माने व ऑल्विन संजय वाघमारे या तीन संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली.