Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup: 'जर भारताविरोधात पराभव झाला तर मी कर्णधारपद...', बाबर आझमचं मोठं विधान

भारत आणि पाकिस्तान संघ आज भिडणार असतानाच बाबर आझम याने आपल्या कर्णधारपदाबद्दल मोठं विधान केलं आहे. तसंच या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर आपण आनंदी नसल्याचंही त्याने सांगितलं आहे.   

World Cup: 'जर भारताविरोधात पराभव झाला तर मी कर्णधारपद...', बाबर आझमचं मोठं विधान

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार असून सर्व क्रिकेटविश्वाचं या सामन्याकडे लक्ष आहे. वर्ल्डकपमधील आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता भारताचं पारडं जड आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा आमने-सामने आले असून, सातही वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. दरम्यान सध्या भारतीय संघाचा फॉर्म पाहता पाकिस्तानचा सहज पराभव होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला तर बाबर आझमचं कर्णधारपद काढलं जाऊ शकतं अशीही चर्चा आहे. यावर आता बाबर आझमनेच भाष्य केलं आहे. 

सध्याच्या वर्ल्डकपच्या निमित्ताने पकिस्तान संघ सात वर्षांनी भारतात खेळत आहे. बाबर आझमने आपल्या कर्णधारपदावर बोलताना सांगितलं आहे की, "एका सामन्याने मला कर्णधारपद मिळालं नव्हतं, आणि एका सामन्याने ते जाणार नाही".

पाकिस्तान एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकदाही भारताचा पराभव करु शकलेला नाही. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडण्याचा दबाव तुझ्यावर आहे का? असं विचारण्यात आलं असता बाबर आझमने सांगितलं की, "मी भूतकाळावर लक्ष केंद्रीत करत नाही. मी भविष्याकडेच पाहत असतो. हे रेकॉर्ड मोडण्यासाठीच तयार झालेले असता आणि मी हा रेकॉर्ड मोडीत काढेन. पहिल्या दोन्ही सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली असून, यापुढेही करत राहू". 

दरम्यान पाकिस्तान वर्ल्डकपमधील भारताविरोधातील 7 ही सामन्यात पराभूत झाल्याची चर्चा वारंवार न्यूज चॅनेल्स, सोशल मीडिया, वृत्तपत्रं येथे होत असतो. मग त्यामुळे निर्माण होणारा दबाव तू कसा हाताळतोस असं विचारण्यात आलं असता बाबर आझमने गंमतीशीर उत्तर दिलं. "मलाही तिकीट मिळावेत यासाठी फार फोन येतात. थोडक्यात लोक मला तिकीटसाठी फोन करतात. भूतकाळातील रेकॉर्ड्सचा मी अजिबात दबाव घेत नाही".

वर्डकपमध्ये पाकिस्तान संघाने पहिले दोन्ही सामने जिंकले असले तरी बाबर आझम फलंदाज म्हणून अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. नेदरलँडविरोधात 5 आणि श्रीलंकेविरोधात 10 धावांवर तो बाद झाला. यावर तो म्हणाला की, "वर्ल्डकपमध्ये मी जशी कामगिरी करायला हवी होती, तशी कामगिरी अद्याप झालेली नाही. पण पुढील सामन्यात कामगिरी सुधारेल अशी मला आशा आहे". 

"भारत आणि पाकिस्तान संघ फक्त वर्ल्डकपमध्ये आमने-सामने येतो. त्यामुळे एक मोठं अंतर असतं. मी गोलंदाजामुळे नाही तर माझ्या चुकीमुळे बाद होतो," असं सांगत बाबरने भारताविरोधातील आपल्या कमी धावांवर स्पष्टीकरण दिलं. जर पाकिस्तानी नागरिकांनाही सामना पाहण्यासाठी व्हिसा दिला असता तर बरं झालं असतं अशी भावनाही त्याने व्यक्त केली. 

Read More