Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'पराभवानंतर PM मोदी ड्रेसिंग रुममध्ये आले अन्...'; टीम इंडियातील खेळाडूंनी शेअर केले फोटो

World Cup Final 2023 PM Modi Visit Dressing Room: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रेसिंग रुममधील फोटो वर्ल्ड कप 2023 मधील भारतीय संघातील खेळाडूंनी सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

'पराभवानंतर PM मोदी ड्रेसिंग रुममध्ये आले अन्...'; टीम इंडियातील खेळाडूंनी शेअर केले फोटो

World Cup Final 2023 PM Modi Visit Dressing Room:  एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. या स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं अन् 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्स राखून पराभव केला. पराभवामुळे भारतीय खेळाडू फारच निराश झाले. या खेळाडूंना धीर देण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुममध्ये गेले होते.

खेळाडू रडू लागले

आपल्याला एवढी मेहनत केल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचं दु:ख भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजला मैदानातच अश्रू अनावर झाले. विराट कोहलीही मैदानातून बाहेर पडताना तोंड लपवूनच बाहेर पडला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मैदानात उपस्थित होते. भारताचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधानांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना धीर दिला. मोदींचा भारतीय ड्रेसिंग रुममधील फोटो भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पोस्ट केला आहे.

शमीने काय म्हटलं आहे

शमीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी शमीला मिठी मारताना दिसत आहेत. मोदी कौतुकाने शमीला शब्बासकी देतानाच त्याला धीर देत असल्याचं फोटोत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, "दुर्देवाने कालचा दिवस आमचा नव्हता. संपूर्ण स्पर्धेमध्ये मला आणि आपल्या संघाला पाठिंबा देणाऱ्या सर्व भारतीयांचे मी आभार मानतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानतो जे स्पेशली ड्रेसिंग रुममध्ये आले आणि त्यांनी आमचं मनोधैर्य वाढवलं. आम्ही नक्कीच पुन्हा दमदार पुनरागमन करु" असं शमीने म्हटलं आहे. मोहम्मद शमी हा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

fallbacks

रविंद्र जडेजाचीही पोस्ट...

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानेही पराभवामुळे आम्हा सर्वांची निराशा झाली असली तरी चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही पुढे वाटचाल करत राहू असं म्हटलं आहे. तसेच जडेजाने पंतप्रधान मोदींनी ड्रेसिंग रुममध्ये येऊन धीर दिल्याचं सांगत मोदींबरोबरच ड्रेसिंग रुममधील फोटोही पोस्ट केला आहे.

भारताच्या डावात काय झालं?

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य वाटलं. भारताने नेहमीप्रमाणे या सामन्यालाही दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने त्याच्या आक्रमक शैलीमध्ये फटकेबाजी केली. मात्र शुभमन गिल स्वस्तात परतल्यानंतर रोहित शर्माही अर्धशतकापासून 3 धावा दूर राहिला. रोहित बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अहमदाबादच्या वापरलेल्या खेळपट्टीचा पूर्ण वापर केला. विराट कोहली आणि के. एल. राहुल या दोघांनाही अर्धशथकं झळकावली. मात्र त्यांनी फारच संथ खेळ केल्याची टीका सोशल मीडियावरुन होताना दिसतेय. सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात विशेष चमक दाखवता आली नाही. तळाचे फलंदाज कुलदीप यादव आणि सिराज यांनी तळाशी फलंदाजी करताना काही फटकेबाजी केल्याने भारताचा स्कोअर 240 पर्यंत पोहोचला.

...अन् ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला

भारतीय गोलंदाजांनी उत्तम सुरुवात केली. 47 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 3 गडी तंबूत परतले होते. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबूशेनने 192 धावांची पार्टनरशीप केली. हेडने शतक झळकावत वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा 7 वा खेळाडू होण्याचा मान मिळवला. भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघ 6 व्यांदा विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, अॅशेज आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे.

Read More