Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'पाकिस्तानविरोधातील सामन्यापेक्षा आई महत्त्वाची,' जसप्रीत बुमराहचं मोठं विधान, म्हणाला 'कुटुंब...'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये शनिवारी सर्वांना उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. दरम्यान, घरच्या मैदानावर पोहोचलेल्या जसप्रीत बुमराहने आपल्या आईला भेटणं प्राथमिकता असल्याचं म्हटलं आहे.   

'पाकिस्तानविरोधातील सामन्यापेक्षा आई महत्त्वाची,' जसप्रीत बुमराहचं मोठं विधान, म्हणाला 'कुटुंब...'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक उत्सुकता भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याची आहे. शनिवारी हा हायव्होल्टेज सामना पार पडणार असून, दोन्ही संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने ही लढत अटीतटीची होईल अशी आशा व्यक्त होत आहे. अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअममध्ये हा सामना होणार आहे. तब्बल 1 लाख 32 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना होणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने जसप्रीत बुमराह आपल्या घऱच्या मैदानावर खेळणार आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहने पाकिस्तानविरोधातील सामन्यापेक्षा आपल्या आईला पाहणं प्राथमिकता असल्याचं म्हटलं आहे. 

"मी बऱ्याच दिवसांपासून घरापासून लांब आहे. आईला घरात पाहिल्यानंतर मला फार आनंद होईल," असं जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानविरोधात 8 गडी राखून विजय मिळवल्यानंतर म्हटलं. बुमराहने या सामन्यात 39 धावांवर 4 विकेट्स घेतले. 

बुमराह 5 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं अचानक निधन झालं होतं. यानंतर त्याच्या शाळेचे मुख्याध्यापक दलजित यांनी बुमराहचा सांभाळ केला होता. "अहमदाबादमध्ये गेल्यानंतर मी सर्वात आधी आईला भेटणार आहे. ही सर्वात मुलभूत बाब आहे," असं बुमराह म्हणाला आहे. त्यानंतर बुमराह पाकिस्तानविरोधातील सामन्यावर आपलं लक्ष केंद्रीत करणार आहे. दरम्यान, घरचं मैदान असल्याने बुमराहला येथील स्थितीचा चांगला अंदाज आहे. 

"मी त्या मैदानात अद्याप एकही एकदिवसीय सामना खेळलेलो नाही. पण तिथे कसोटी सामना खेळलो आहे. तेथील वातावरण उत्साही असणार आहे. मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत याची मला खात्री आहे. त्यामुळे ते पाहणं कौतुकाची बाब असेल. तिथे मी चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे," असं बुमराहने म्हटलं आहे. 

मँचेस्टर युनायटेडचा चाहता असणाऱ्या बुमराहने अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रानला बाद केल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरलं होतं. दरम्यान ही युनायटेड स्ट्रायकर मार्कस रॅशफोर्डला श्रद्धांजली नव्हती असं त्याने स्पष्ट केलं आहे. "तसं काही नाही. मला वाटलं म्हणून ते केलं," असं त्याने सांगितलं. 

भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात तडाकेबंद फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला नमवलं. भारताने 8 गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. याआधी बांगलादेशने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. 

अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर याच्याकडे 15 व्या ओव्हरला चेंडू सोपवण्यात आला. त्यावेळी भारताने एकही गडी न गमावता 125 धावा ठोकल्या होत्या. प्रशिक्षक ट्रॉट यांनी कर्णधार हसमतुल्लाह याला आपण काय करतोय हे माहिती होतं असं म्हटलं आहे. पण राशीदसारख्या गोलंदाजाला लवकर आणलं पाहिजे हेदेखील त्यांनी मान्य केलं आहे. 

Read More