Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहितला मागे टाकत विराटचे २ विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

रोहितला मागे टाकत विराटचे २ विक्रम

मोहाली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला. या विजयासोबतच भारताने ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. सीरिजची पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली होती. या मॅचमध्ये विराट कोहलीने ५२ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. विराटच्या या खेळीमध्ये ४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. या कामगिरीबद्दल विराटला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

या अर्धशतकासोबतच विराटने रोहितचा टी-२० क्रिकेटमधल्या सर्वाधिक रनचा विक्रम मोडित काढला आहे. या मॅचआधी रोहित शर्माच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २४२२ रन केल्या होत्या, तर विराटने २३६९ रन केल्या होत्या. या मॅचमध्ये रोहित १२ रनवर आऊट झाला. त्यामुळे आता विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २४४१ रन आहेत, तर रोहितने २,४३४ रन केले आहेत. त्यामुळे विराट हा आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे.

विराटने रोहितचा ५० पेक्षा अधिक रन करण्याच्या विक्रमालाही मागे टाकलं आहे. या मॅचआधी विराट आणि रोहितने २१-२१ वेळा ५० पेक्षा जास्त रन केल्या होत्या. यात विराटची सगळी अर्धशतकं होती, तर रोहितने १७ अर्धशतकं आणि ४ शतकं केली आहेत. या मॅचनंतर आता विराटच्या नावावर सर्वाधिक २२ अर्धशतकं आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर तर सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम विराटच्या नावावर आहे. 

Read More