Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अंडर १९ वर्ल्ड कप : या टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय

अली जरयाब आसिफच्या नाबाद ७४ रन्सच्या खेळीमुळे अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे.

अंडर १९ वर्ल्ड कप : या टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय

क्राइस्टचर्च : अली जरयाब आसिफच्या नाबाद ७४ रन्सच्या खेळीमुळे अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे. या विजयामुळे पाकिस्ताननं वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडमधल्या हेग्ले ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या या क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला तीन विकेटनं हरवलं.

या मॅचमध्ये पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेला ५० ओव्हरमध्ये १८९ रन्सपर्यंतच मजल मारून दिली. दक्षिण आफ्रिकेच्या वांडिले मकवेतुनं ६० आणि जेसन नीमांडनं ३६ रन्स केल्या.

पाकिस्तानच्या मोहम्मद मुसानं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. १९० रन्सचा पाठलाग करायला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १०० रन्सचा आकडा पार करण्याच्या आतच पाकिस्तानच्या ६ विकेट गेल्या होत्या. पण जरयाबनं डाव सांभाळला आणि अर्धशतकीय खेळी करुन पाकिस्तानला विजय मिळवून दिला. जरयाबलाच मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

पाकिस्तानबरोबरच ऑस्ट्रेलियानंही सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी खेळवण्यात आलेल्या क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला ३१ रन्सनी हरवलं. तर दुसरीकडे अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला पराभवाचा धक्का देत सेमी फायनल गाठली आहे. २९ जानेवारीला अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेमी फायनल होणार आहे.

सेमी फायनलमध्ये जायची भारतालाही संधी

या वर्ल्ड कपमध्ये एकही पराभव झालेला नसलेला भारत २६ जानेवारीला बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. या मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर भारत सेमी फायनलमध्ये पोहोचेल.

तर भारत-पाकिस्तानमध्ये सेमी फायनल

बांग्लादेशविरुद्ध झालेली मॅच भारत जिंकला तर ३० तारखेला भारत आणि पाकिस्तानमध्ये क्राइस्टचर्चला सुपरलीग सेमी फायनल होईल. 

Read More