Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अरुण कानडे... टीम इंडियातील मराठमोळं नाव; यांचा संघर्ष पाहता कौतुक करावं तितकं कमीच...

Team India T20WC Win : मुख्यमंत्र्यांपासून खुद्द रोहित शर्मानंही कौतुक केलेली ही व्यक्ती संघासाठी कमाल महत्त्वाची. भारतीय क्रिकेट संघातील पडद्यामागचा चेहरा....   

अरुण कानडे... टीम इंडियातील मराठमोळं नाव; यांचा संघर्ष पाहता कौतुक करावं तितकं कमीच...
Updated: Jul 06, 2024, 01:13 PM IST

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : परदेशी भूमीवर विरोधी संघाला अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून दिल्यानंतर अखेर भारतीय क्रिकेट संघ भारतात परतला. हा क्षण संघासाठी जितका महत्त्वाचा होता तितकाच किंबहुना त्याहूनही कैक पटींनी तो भारतीयांसाठी महत्त्वाचा होता. क्रिकेटला सर्वतोपरि महत्त्वं असणाऱ्या या देशासाठी संघ मायदेशी परतणं म्हणजे कोणा एका सणाहून कमी नव्हतं. याचीच प्रचिती मुंबईच्या विक्ट्री परेडमध्ये (Team India Mumbai Victory Parade) पाहायला मिळाली. (Team India T20WC Win )

Team India नं ज्या क्षणी क्रिकेट विश्वचषक जिंकला त्या क्षणापासूनच संघाचे, प्रशिक्षकपदी असणाऱ्या राहुल द्रविडचे आणि संघातील खऱ्या अर्थानं पडद्यामागचे नायक असणाऱ्या सपोर्ट टीमचे अनेक फोटो व्हायरल झाले. संघासोबतच वावरणाऱ्या याच सपोर्ट टीममधील एक चेहरा नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळातील सत्कार समारंभातही दिसला. खेळाडूंच्या सोबतीनं कौतुकास पात्र ठरलेला हा चेहरा आहे अरुण कानडे यांचा. संघातील खेळाडूंसाठी 'अरुण भाऊ' म्हणजे हक्काचा माणूस... 

अरुण कानडे (Arun Kanade) यांनी विक्ट्री परेडनंतर जेव्हा कैक दिवसांनी आपलं घर गाठलं, तेव्हा तिथं शेजारीपाजारी, नातेवाईक मंडळींसह त्यांची आई आणि पत्नी स्वागतासाठी सज्ज होते. इथं खेळाडूंचं दणक्यात स्वागत होत असतानाच तिथं कानडे कुटुंबीयांचा उत्साह शिगेला पोहोचणारा होता. आपल्या हक्काच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आईला मारलेली मिठी नकळतच अनेकांच्या डोळ्यात पाणी आणून गेली, तर पत्नीच्या चेहऱ्यावरील आनंदही नकळतच खुप काही सांगून गेला. 

कोण आहेत अरुण कानडे? 

पुणे जिल्ह्यातील कळंब गावाशी नाळ जोडलेले अरुण कानडे मुंबईचेच रहिवासी. गिरणगाव अर्थात परळमधील सर्वसामान्य कुटुंबातील अरुण यांनी जीवनात संघर्षाचे अनेक दिवस पाहिले आणि याच संघर्षानं त्यांना खऱ्या अर्थानं मोठं केलं. सुरुवातीचे काही दिवस अतिशय तुटपुंज्या पगारात चालकाची नोकरी करणाऱ्या अरूण कानडे यांनी रितसर मसाज थेरेपीचं शिक्षण घेतलं आणि हा निर्णय त्यांना नकळत जीवनातील प्रत्येक टप्प्यावर हळुहळू पुढे नेत गेला. 

कालांतरानं त्यांनी मसाज थेरपिस्ट म्हणून पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली. 2011 हे वर्ष त्यांच्या जीवनाला नवं वळण देणारं ठरलं, कारण इथं त्यांना भेटला क्रिकेटचा देव, अर्थात सचिन तेंडुलकर. हा क्षण जणू परिसस्पर्शाइतकाच महत्त्वाचा होता. इथून त्यांच्या कारकिर्दीला जो वेग मिळाला तो आजपर्यंत थांबलेला नाही. 2012 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच IPL मध्ये मुंबईच्या संघासोबत आणि त्यानंतर बंगळुरूच्या संघासोबत काम केलं. संघाच्या सपोर्ट स्टाफपैकी एक असतानाच अरुण कानडे यांनी त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाच्या बळावर खेळाडूंशीही मैत्रीचं नातं बनवलं आणि हा ठेवा त्यांनी आजपर्यंत जपल्याचं पाहायला मिळतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arun Kanade (@arunkanade)

एकदिवसीय विश्वचषकापासून टी20 विश्वचषकापर्यंत, जवळपास गेली 9 ते 10 वर्षे अरुण कानडे भारतीय संघाचा अविभाज्य भाग असून, त्यांचं संघाप्रती असणारं महत्त्वं नेमकं किती आहे हे हल्लीच रोहित शर्मानं केलेल्या वक्तव्यातून स्पष्ट झालं. संघातील खेळाडूंनी जरी मैदान जिंकलं असलं तरीही संघासाठी मेहनत घेणारे अरुण कानडे आणि त्यांच्यासारखेच इतर सपोर्ट स्टाफ म्हणून काम पाहणारे चेहरे खऱ्या अर्थानं पडद्यामागचे नायक आहेत असं म्हणणं गैर नाही.