Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कोलकाता वनडे रद्द झाल्यानंतर ममता बॅनर्जी गांगुलीवर नाराज

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर नाराज झाल्या आहेत.

कोलकाता वनडे रद्द झाल्यानंतर ममता बॅनर्जी गांगुलीवर नाराज

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर नाराज झाल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या २ वनडे रद्द करण्याचा निर्णय घेतला. यातली शेवटची मॅच १८ मार्चला कोलकात्याला होणार होती. पण याबाबत कोलकाता पोलिसांना माहिती दिली नसल्यामुळे ममता बॅनर्जींनी नाराजी व्यक्त केली.

'सौरव गांगुलीसोबत सगळं ठीक होतं. पण त्यांनी मॅच रद्द केल्याबाबत आम्हाला सांगितलं पाहिजे होतं. दुसरं काही नाही. मॅच जर कोलकात्यात होणार होती, तर ती रद्द झाल्याबद्दल निदान कोलकाता पोलिसांना तरी सांगायची गरज होती,' असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

'राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव किंवा कोलकाता पोलीस आयुक्तांना याबाबत माहिती का देण्यात आली नाही? तुम्ही निर्णय घेतल्यानंतरही आम्हाला सांगावसं वाटलं नाही? आम्ही तुम्हाला मॅच थांबवायला सांगणार नव्हतो. पण आमच्या जागी तुम्ही असतात तर काय केलं असतंत?' असे सवाल ममता बॅनर्जींनी उपस्थित केले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे भारतातल्या सगळ्या क्रिकेट स्पर्धा थांबवण्यात आल्या आहेत. इराणी कपही न खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा धोका टळला नाही तर आयपीएलही रद्द होऊ शकते. तरीही आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेतला तर स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवली जाऊ शकते.

जगभरामध्ये कोरोनाचे १ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. भारतात ही संख्या १००च्या जवळपास आहे. जगभरात कोरोनामुळे ५ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारने कोरोनाच्या भीतीमुळे परदेशातून भारतात येणाऱ्यांच्या पर्यटक व्हिसांना स्थगिती दिली आहे.

Read More