Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2019: 'बुमराह जगात भारी'; सचिनने सांगितला मॅचमधला निर्णयाक क्षण

आयपीएलच्या मेगा फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला पराभूत करून ४ वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रम केला.

IPL 2019: 'बुमराह जगात भारी'; सचिनने सांगितला मॅचमधला निर्णयाक क्षण

हैदराबाद : आयपीएलच्या मेगा फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला पराभूत करून ४ वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रम केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या बॉलवर मुंबईला विजय मिळवून दिला असला तरी विजयाचा शिल्पकार ठरला तो जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहने ४ ओव्हरमध्ये फक्त १४ रन देऊन २ विकेट घेतल्या. मुंबईच्या टीमचा मेंटर सचिन तेंडुलकरनेही जसप्रीत बुमराहच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

'एमएस धोनीचा रनआऊट या मॅचमधला निर्णयाक क्षण होता. तसंच बुमराहनेही या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मलिंगाच्या एका ओव्हरला २० रन गेल्या होत्या आणि कृणाल पांड्यानेही त्याच्या एका ओव्हरमध्ये २० रन दिल्या. यानंतर टाकलेल्या पुढच्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने सर्वोत्तम बॉलिंग केली,' असं सचिन म्हणाला.

मॅचनंतर बोलताना सचिन तेंडुलकरने राहुल चहरचंही कौतुक केलं. पहिली मॅच खेळण्याच्या आधीच राहुल चहर हा उत्कृष्ट बॉलर असल्याचं मी म्हणालो होतो. ६व्या ओव्हरपासून १५व्या ओव्हरपर्यंत महत्त्वाच्या मॅचमध्ये स्लिपमध्ये फिल्डर ठेवून बॉलिंग करणं ही राहुल चहरची गुणवत्ता दाखवते, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली. हार्दिक पांड्याने संपूर्ण स्पर्धेदरम्यान केलेल्या कामगिरीबद्दलही सचिनने भाष्य केलं.

'जसप्रीत बुमराह हा सध्या जगातला सर्वोत्तम बॉलर आहे. त्याच्याकडून अजून सर्वश्रेष्ठ कामगिरीची मला अपेक्षा आहे,' असं वक्तव्य सचिन तेंडुलकरने केलं.

फायनलमधल्या या कामगिरीबद्दल बुमराहला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या मॅचनंतर बुमराह म्हणाला, 'मुंबईसाठी आम्हाला विजय मिळवायचा होता, कारण हा खास क्षण असतो. त्यामुळे आम्ही संयम ठेवला, मी देखील संयमित होतो. टीमच्या यशामध्ये मला योगदान द्यायचं होतं. मी प्रत्येक बॉलसाठी वेगळी रणनिती बनवतो. असं केल्यामुळे स्वत:वर कमी दबाव येतो.'

बुमराहने आयपीएलच्या १२व्या मोसमात १६ मॅचमध्ये १६ विकेट घेतल्या, पण त्याचा इकोनॉमी रेट फक्त ६.६३ एवढाच राहिला. 

Read More