Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सचिनसह दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा क्रिकेटच्या मैदानात

पुन्हा बघायला मिळणार क्रिकेटमधले जुने दिवस

सचिनसह दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा क्रिकेटच्या मैदानात

मुंबई : सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग आणि मुथय्या मुरलीधरन यांच्यासारखे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. रस्ते सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी टी-२० स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत हे सगळे दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज असं या सीरिजचं नाव असणार आहे. जॅक कॅलिस, ब्रेट ली, शिवनारायण चंद्रपॉल हे खेळाडूदेखील या सीरिजमध्ये सहभागी होणार आहेत.

२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान मुंबईमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. इंडिया लिजंड्स, ऑस्ट्रेलिया लिजंड्स, दक्षिण आफ्रिका लिजंड्स, श्रीलंका लिजंड्स आणि वेस्ट इंडिज लिजंड्स अशी या सगळ्या टीमची नावं आहेत.

या स्पर्धेसाठी एकूण ११० खेळाडू सहभागी होणार आहेत, यातले सगळे खेळाडू हे निवृत्त आहेत. टी-२० लीगसारखीच ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या मोसमात फक्त टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या खेळाडूंनाच सहभागी करून घेण्यात आलं आहे.

पुढच्या १० वर्षांमध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागात या स्पर्धेचं आयोजन करण्याचा आयोजकांचा मानस आहे. ऑगस्ट २०१८ मध्येच बीसीसीआयकडून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली होती.

खेळाडूंचं मानधन फ्रॅन्चायजी देणार आहेत, तर स्पर्धेतून होणारा नफा रस्ते सुरक्षा अभियान चालवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. २०१३ साली सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली होती. यानंतर २०१४ साली लॉर्ड्सच्या मैदानात सचिन एमसीसीकडून जागतिक-११ टीमविरुद्ध खेळला होता. २०१५ सालीही अमेरिकेत एका मॅचमध्ये सचिन खेळला होता.

Read More