Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'बाबा पुन्हा एकदा हसतील,' वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या लेकीचा VIDEO व्हायरल

वर्ल्डकपमधील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.   

'बाबा पुन्हा एकदा हसतील,' वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या लेकीचा VIDEO व्हायरल

वर्ल्डकपमधील पराभव भारतीय संघाच्या फार जिव्हारी लागला आहे. सलग 10 सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात मात्र गंडला आणि ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पराभव करत करोडो भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा पाडली. भारताची कामगिरी पाहता यावेळी विश्वविजेता होईल याची सर्वांनाच खात्री होती. पण अगदी अखेरच्या क्षणी अपेक्षित कामगिरी न झाल्याने ऑस्ट्रेलिया संघाने तोंडचा घासच हिरावून घेतला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर झाले होते. रोहित शर्मा मैदानातून परतत असताना त्याचे पाणावलेले डोळे पाहून चाहत्यांनाही गहिवरुन आलं होतं. त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातच आता रोहित शर्माच्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रोहित शर्माच्या लेकीचा हा व्हिडीओ तसा जुना आहे. एक वर्षांपूर्वीच्या या व्हिडीओ समायरा बोलत आहे की, "तो (रोहित शर्मा) रुममध्ये आहे. तो सकारात्मक असून एका महिन्यात पुन्हा एकदा हसेल".

रोहित आणि विराटला भविष्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य

टी-20 वर्ल्डकप आता काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. यादरम्यान काही रिपोर्ट्सनुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आता टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार नाहीत. पण हे रिपोर्ट फेटाळले जात आहेत. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या टी-20 मधील भवितव्याचा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे ते दोघं जो काही निर्णय घेतली तो बीसीसीआयला मान्य असणार आहे. 

रिपोर्टनुसार, बोर्ड या दोन्ही खेळाडूंवर कोणताही दबाव टाकणार नसून त्यांना त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेण्याची सूट देणार आहे. जर रोहित शर्मा, विराट कोहली फिट असतील आणि त्यांची टी-20 वर्ल्डकप खेळण्याची इच्छा असेल तर दोघंही संघाचा भाग असतील आणि बीसीसीआय त्यांच्या पाठीशी उभी राहील. 

पण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. वर्ल्डकपमधील पराभवानंतर दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरोधातील 5 सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेत दोघेही खेळण्याची शक्यता आहे. याशिवाय राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपत असून, तो वाढवण्याची त्याची इच्छा नाही. यामुळे बीसीसीआय लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी खेळाडू आणि द्रविडचा एकेकाळचा सहकारी व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाऊ शकते. यामुळे टी 20 वर्ल्डकपआधी भारतीय संघाला सूर गवसेल अशी आशा आहे. 

भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकला  होता तेव्हा रोहित शर्मा त्या संघाचा भाग होता. दरम्यान 2024 चा वर्ल्डकप त्याची ही स्पर्धा जिंकण्याची शेवटची संधी असू शकते. त्यामुळे तो संघात पुनरागन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दुसरीकडे रोहित शर्माला त्याच्या टी-20 संबंधी निर्णय घ्यायचा आहे. बीसीसीआयने त्याला वेळ दिला असून, दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेआधी निर्णयाची घोषणा होऊ शकते. जर रोहित शर्माने टी-20 पासून लांब राहण्याचा निर्णय घेतला तर हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली जाऊ शकते. 

Read More