Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

...अन् आऊट नसतानाही पवेलियनध्ये परतला पोलार्ड; फॅन्सनाही बसला धक्का

वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यादरम्यान एक विचित्र घटना पाहायला मिळाली.

...अन् आऊट नसतानाही पवेलियनध्ये परतला पोलार्ड; फॅन्सनाही बसला धक्का

दुबई : शुक्रवारी गतविजेता वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यादरम्यान एक विचित्र घटना पाहायला मिळाली. बांग्लादेशी संघाने बाद न करताही कर्णधार किरॉन पोलार्ड ड्रेसिंग रुममध्ये परतला. इतकंच नाही तर तो मैदानावर पूर्णपणे तंदुरुस्त दिसत होता. असं असताना देखील त्याने स्वत:ला रिटायर्ड हर्ट घोषित केलं. पोलार्डच्या या निर्णयाने सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ही संपूर्ण घटना सामन्याच्या 13व्या ओव्हरदरम्यान घडली. तस्किन अहमदच्या तिसऱ्या चेंडूवर रन घेत किरॉन पोलार्ड नॉनस्ट्राइकिंग एंडला गेला. त्यानंतर तो पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याला 16 चेंडूत केवळ 8 धावा करता आल्या. पोलार्डने मैदान सोडल्यानंतर आंद्रे रसेल मैदानावर आला, पण तो एकंही चेंडू न खेळताच धावबाद झाला (डायमंड डक). यासह, रसेल टी-20 विश्वचषकात डायमंड डकवर बाद होणारा नववा फलंदाज ठरला आहे.

मात्र, पोलार्ड किंवा वेस्ट इंडिज संघ मॅनेजमेंटकडून अधिकृत कारण दिलेलं नाही. असं मानले जातंय की, त्याच्या बॅटवर चेंडू नीट येत नव्हता, म्हणून त्याने असं केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये ड्वेन ब्राव्हो बाद झाल्यानंतर पोलार्ड पुन्हा मैदानात परतला आणि शेवटच्या चेंडूवर मिडविकेटवर सिक्स ठोकला. अशा प्रकारे त्याने 18 चेंडूत नाबाद 14 धावांची खेळी खेळली.

वेस्ट इंडिजने 20 ओव्हरने 7 बाद 142 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने 22 चेंडूत चार सिक्सच्या मदतीने 40 धावा केल्या. याशिवाय रोस्टन चेसने 39 आणि जेसन होल्डरने नाबाद 15 धावा केल्या. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमान, मेहदी हसन आणि शरीफुल इस्लाम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले.

Read More