Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

१५०+ वेगाने बॉल टाकणारा सैनी म्हणतो, 'या बॉलरने शिकवला यॉर्कर'

भारताने दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये श्रीलंकेचा ७ विकेटने पराभव केला.

१५०+ वेगाने बॉल टाकणारा सैनी म्हणतो, 'या बॉलरने शिकवला यॉर्कर'

इंदूर : भारताने दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये श्रीलंकेचा ७ विकेटने पराभव केला. या मॅचमध्ये फास्ट बॉलर नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूरच्या जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली. या दोघांनी मिळून श्रीलंकेच्या ५ विकेट घेतल्या. नवदीप सैनीने ४ ओव्हरमध्ये फक्त १८ रन देऊन २ विकेट घेतल्या. या कामगिरीबद्दल सैनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. शार्दुल ठाकूरने २३ रन देऊन ३ विकेट घेतल्या.

मॅचनंतर नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूरच्या जोडीने युझवेंद्र चहलसोबत चहल टीव्हीवर बातचित केली. नवदीप सैनीने इनिंगच्या आठव्या ओव्हरला दनुष्का गुणतिलकाला १४८ किमी प्रती तासाच्या वेगाने यॉर्कर टाकला. हा यॉर्कर स्टम्पला जाऊन आदळला. जसप्रीत बुमराहकडून मी यॉर्कर शिकल्याचं सैनीने सांगितलं.

'मॅच सुरु झाली तेव्हाच खेळपट्टी पाटा असल्याचं माझ्या लक्षात आलं. चांगली बॉलिंग करुन आत्मविश्वास वाढवू शकतो, असं मी स्वत:ला सांगितलं. या मॅचमध्ये मी चांगले यॉर्कर टाकले. मी जेव्हा बुमराहला यॉर्करबद्दल बोलताना ऐकतो तेव्हा तो अचूकतेबद्दल सांगतो,' असं नवदीप सैनी म्हणाला.

या मॅचमध्ये नवदीप सैनीने सगळ्यात जलद १५१ किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकला. नवदीप सैनी आयपीएलमध्ये विराटच्या बंगळुरुकडून खेळतो. २०१८ साली बंगळुरुने सैनीला ३ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी टी-२० मॅच शुक्रवारी पुण्यात खेळवली जाणार आहे. ३ मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-०ने आघाडीवर आहे. गुवाहाटीमध्ये झालेली पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली होती.

Read More