Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कर्नाटकातील 'या' तरुणाने तोडला उसेन बोल्टचा विक्रम?

श्रीनिवास गौडा हा गेल्या सात वर्षांपासून म्हशींच्या शर्यतीमध्ये  Kambala jockey म्हणून काम करत आहे.

कर्नाटकातील 'या' तरुणाने तोडला उसेन बोल्टचा विक्रम?

बंगळुरू: सध्या सोशल मीडियावर म्हशींसोबत जीव तोडून पळत असलेल्या कर्नाटकातील एका तरुणाचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. हे छायाचित्र कर्नाटकातील कम्बाला शर्यतीमधील (म्हशींची शर्यत) आहे. यामध्ये २८ वर्षांचा श्रीनिवास गौडा हा तरूण म्हशींसोबत धावताना दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी हा फोटो शनिवारी ट्विट केला होता. म्हशींसोबत धावताना या तरुणाने अवघ्या ९.५५ सेकंदात १०० मीटर अंतर पार केल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. 

जमैकाचा सुप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याच्या नावावर ९.५५ सेकंदात १०० मीटर अंतर पार करण्याचा विश्वविक्रम आहे. त्यामुळे कर्नाटकमधील या तरुणाने उसेन बोल्टच्या वेगाशी बरोबरी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. शशी थरूर यांनीही नेटकऱ्यांची री ओढत भारतीय अॅथलेटिक्स असोसिएशनला श्रीनिवास गौडाला (Srinivasa Gowda) आपल्या छत्राखाली घेण्याची विनंती केली आहे. श्रीनिवास गौडाला प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिकला पाठवण्याची इच्छाही थरूर यांनी बोलून दाखविली आहे. 

थरूर यांच्या या ट्विटनंतर सरकारी पातळीवर वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी या सगळ्याची दखल घेतली आहे. त्यांनी भारतीय खेळाडुंना प्रशिक्षण देणाऱ्या SAI या संस्थेला श्रीनिवास गौडाची चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय घडणार, याची प्रचंड उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

श्रीनिवास गौडा हा गेल्या सात वर्षांपासून म्हशींच्या शर्यतीमध्ये  Kambala jockey म्हणून काम करत आहे. १ फेब्रुवारीला मंगलोरजवळील गावामध्ये एका शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीनिवास गौडाने म्हशींसोबत १४२.५ मीटरचे अंतर १३.६२ सेकंदात पार केले. याचा हिशेब लावायचा झाल्यास श्रीनिवास गौडाने उसेन बोल्टच्या विश्वविक्रमापेक्षा सरस कामगिरी केल्याचे बोलले जात आहे. मात्र, SAI च्या प्रशिक्षकांनी श्रीनिवास गौडाची चाचणी घेतल्यानंतरच याची अधिकृत खातरजमा होऊ शकेल. 

Read More