Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणतो, गे असणं गैर नाही

क्रिकेटच्या मैदानात होणारं स्लेजिंग काही नवीन नाही.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणतो, गे असणं गैर नाही

सेंट लुशिया : क्रिकेटच्या मैदानात होणारं स्लेजिंग काही नवीन नाही. वेस्टइंडिज आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्टइंडिजचा फास्ट बॉलर शॅनन गॅब्रियल यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या दोघांमध्ये झालेलं स्लेजिंगनं सीमा पार केल्याचं बोललं जातंय. पण दोघांमध्ये नेमकी काय बातचित झाली, हे अजून समोर आलेलं नाही. रूट आणि गॅब्रियल यांच्यामध्ये झालेल्या वादावादीचा आवाज स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाला आहे. 'याचा वापर कोणाचा अपमान करण्यासाठी करू नका, गे(समलैंगिक) असण्यामध्ये काहीच वाईट नाही', असं उत्तर रूटनं गॅब्रियलला दिल्याचं स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाल्याचं वृत्त इएसपीएन क्रिकइन्फोनं दिलं आहे.

मैदानात झालेल्या या सगळ्या प्रकारानंतर अंपायरनी याबद्दल चर्चा केली. मैदानात झालेल्या या घटनेची जो रूट तक्रार करणार नाही. 'अशाप्रकारच्या गोष्टी मैदानात होत असतात. लोकं मैदानात जे बोलतात याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. या गोष्टी मैदानातच रहाव्यात' असं रूट दिवस संपल्यानंतर म्हणाला.

कर्णधार जो रूटच्या शतकाच्या मदतीनं इंग्लंड तिसऱ्या टेस्टमध्ये मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं त्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ३२५/४ एवढा स्कोअर केला होता. आता इंग्लंडकडे ४४८ रनची आघाडी आहे. इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये २७७ रन केले होते. यानंतर बॅटिंगला आलेल्या वेस्टइंडिजला १५४ रनपर्यंतच मजल मारता आली.

रूटनं विराटला मागे टाकलं

जोर रूटनं त्याच्या शतकी खेळीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं आहे. जो रूटनं ८० टेस्टच्या १४७ इनिंगमध्ये ६,६७४ रन केल्या आहेत. तर विराटनं ७७ टेस्टच्या १३१ इनिंगमध्ये ६,६१३ रन केल्या आहेत. रनच्या बाबतीत विराट कोहली जो रुटच्या मागे पडला असला, तरी शतकांच्याबाबतीत मात्र विराट बराच पुढे आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर २५ शतकं आणि जो रूटच्या नावावर १६ शतकं आहेत. टेस्टमध्ये विराटची सरासरी ५३.७६ आणि जो रूटची सरासरी ४९.८० आहे. अर्धशतकांच्याबाबतीत जो रूट विराटच्या बराच पुढे आहे. रूटनं आत्तापर्यंत ४१ अर्धशतकं तर विराटनं २० अर्धशतकं केली आहेत.

वेस्टइंडिजविरुद्ध १२३ रनची आघाडी घेणाऱ्या इंग्लंडनं तिसऱ्या दिवसाची सुरुवात १९/० अशी केली होती. तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं फक्त ४ विकेट गमावल्या. रोरी बर्न्सच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का लागला. कीमो पॉलनं बर्न्सची विकेट घेतली. पायाला दुखापत झाल्यामुळे कीमो पॉलला मैदान सोडावं लागलं.

किटन जेनिंग्स २३ रनवर जोसेफचा शिकार झाला. पहिल्या २ विकेट गेल्यानंतर जो रूटनं इंग्लंडची खेळी सावरली. रूट सध्या २०९ बॉलमध्ये १११ रनवर नाबाद खेळत आहे. रूटच्या या खेळीमध्ये ९ फोरचा समावेश आहे. रूटनं तिसऱ्या विकेटसाठी जो डेनली(६९रन) सोबत ७४ रनची, यानंतर चौथ्या विकेटसाठी जॉस बटलर(५६ रन) बरोबर १०७ रनची भागीदारी केली. सध्या जो रूट आणि बेन स्टोक्स (नाबाद २९ रन) यांच्यामध्ये ७१ रनची नाबाद भागीदारी सुरू आहे.

या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला तरी त्यांनी सीरिज आधीच गमावली आहे. ३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमधल्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये वेस्टइंडिजचा विजय झाला.

Read More