Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

हार्दिक पांड्या IPL 2024 मधून बाहेर? MI ची चिंता वाढली; रोहित की बुमराह...कोण होणार नवा कर्णधार?

हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. जर हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सला नवा कर्णधार शोधावा लागेल.   

हार्दिक पांड्या IPL 2024 मधून बाहेर? MI ची चिंता वाढली; रोहित की बुमराह...कोण होणार नवा कर्णधार?

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू ठरला आहे. याचं कारण मुंबई इंडियन्सने तब्बल 15 कोटी मोजत गुजरात टायटन्समधून त्याला ट्रेड केलं आहे. इतकंच नाही तर मुंबईने रोहितकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिककडे सोपवलं आहे. पण यानंतरही मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे चिंता आहे. वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून हार्दिक पांड्या क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे. 

काही मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मधून बाहेर होऊ शकतो. तर काही रिपोर्टमध्ये तो स्पर्धेआधी फिट होईल असा दावा केला जात आहे. म्हणजेच थोडक्यात हार्दिक पांड्या खेळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. पण जर हार्दिक पांड्या खेळू शकला नाही आणि संघातून बाहेर पडला तर मात्र मुंबईसमोर कर्णधारपद कोणाकडे सोपवायचं हा मोठा प्रश्न असणार आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी कोणाला दिली जाऊ शकते याबद्दल जाणून घ्या. 

जसप्रीत बुमराह

मुंबई इंडियन्सने कर्णधारपदासाठी जलदगती गोलंदाज बुमराहच्या नावाचा विचार केला नाही आणि हार्दिककडे कर्णधारपद सोपवलं ही फार आश्चर्याची बाब आहे. बुमराह 2023 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. त्याने भारतीय संघासाठी काही सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यावर्षी आयर्लंड दौऱ्यातही बुमराहने कर्णधारद सांभाळलं होतं. त्यामुळे जर मुंबई इंडियन्सकडे कर्णधारपद रिकामं असेल तर बुमराहच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. 

सूर्यकुमार यादव

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी-20 मालिकेत सूर्यकुमारने भारतीय संघाचं नेतृत्व केलं. गेल्या हंगामात एका सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. रोहितनंतर सूर्याकडेच कर्णधारपद सोपवतील असं बोललं जात होतं. पण संघ व्यवस्थापनाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण जर हार्दिक फिट झाला नाही तर सूर्याला कर्णधारपद मिळू शकतं. पण सूर्याही सध्या जखमी असून, फेब्रुवारी महिन्यात मैदानात परतण्याची शक्यता आहे. 

रोहित शर्मा

हार्दिक पांड्या अनफिट राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा रोहितकडे कर्णधारपद भूषवण्याची विनंती करु शकतं. पण रोहित त्यासाठी होकार देईल का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. रोहितने मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे. रोहितने 2013 मध्ये सर्वात प्रथम मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं होतं. 

आयपीएल 2024 च्या लिलावाआधी मुंबईने ट्रेडिंग विंडोच्या आधारे हार्दिकला संघात सहभागी करुन घेतलं होतं. हार्दिकने मागील दोन हंगामात गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलं. हार्दिक पांड्याच्या करिअरमध्ये मुंबईचा मोठा वाटा आहे. 2015 मध्ये मुंबईने त्याला 10 लाखात खरेदी केलं होतं. 2015, 2017, 2019 आणि 2020 मधील विजेच्या संघाचा तो भाग होता. 

मुंबई इंडियन्सचा सध्याचा संघ - 

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएट्जी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.  

Read More