Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

निर्णायक वनडेआधी टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट टेन्शनमध्ये

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी आणि अखेरची वनडे मॅच आज बंगळुरूमध्ये खेळवण्यात येणार आहे.

निर्णायक वनडेआधी टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट टेन्शनमध्ये

बंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी आणि अखेरची वनडे मॅच आज बंगळुरूमध्ये खेळवण्यात येणार आहे. वनडे सीरिज १-१ने बरोबरीत असल्यामुळे ही मॅच निर्णायक ठरणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला १० विकेटने मात दिली. भारताचा वनडे क्रिकेटमधला हा सगळ्यात मोठा पराभव ठरला. यानंतर राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताने जोरदार पुनरागमन केलं.

राजकोटच्या वनडेमध्ये भारतीय बॅट्समननी शानदार कामगिरी करत ३४० रनपर्यंत मजल मारली. शिखर धवन, विराट कोहली आणि लोकेश राहुलने अर्धशतकं केली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ३०४ रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे भारताने ही मॅच ३६ रननी जिंकली. मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराहने टाकलेले यॉर्कर्स आणि कुलदीप-जडेजाने योग्यवेळी घेतलेल्या विकेटमुळे भारताने सामना जिंकला.

विराटला दुखापतींचं टेन्शन

तिसऱ्या वनडेआधी कर्णधार विराट कोहली खेळाडूंच्या दुखापतीमुळे चिंतेत आहे. दुसऱ्या वनडेवेळी शिखर धवन आणि रोहित शर्माला दुखापत झाली. बॅटिंग करत असताना शिखर धवनच्या छातीला बॉल लागला. बॉल लागल्यानंतर धवनने बॅटिंग तर केली, पण तो फिल्डिंगला आला नाही. तर रोहित शर्माच्या हाताला फिल्डिंग करत असताना दुखापत झाली. दुखापतीनंतर रोहितही फिल्डिंगला उतरला नाही.

रोहित शर्मा तिसऱ्या वनडेमध्ये खेळेल, असे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत, पण शिखर धवनबाबत मात्र विराट काही बोलला नाही. पहिल्या वनडेवेळी विकेट कीपर ऋषभ पंतला दुखापत झाली होती, त्यामुळे केएल राहुलने विकेट कीपिंग केली होती. केएल राहुलने चांगली कामगिरी केल्यामुळे तिसऱ्या मॅचमध्ये पंतची निवड होण्याची शक्यता कमी आहे.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममधली ऑस्ट्रेलियाची कामगिरी उल्लेखनीय आहे. या मैदानात मागच्या तिन्ही मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. तर भारतीय टीम राजकोटच्या विजयानंतर लयीमध्ये आहे.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलियाची टीम

एरॉन फिंच, एलेक्स कॅरी (उपकर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, सीन एबॉट, केन रिचर्डसन, एश्टन अगर, जॉस हेजलवूड, मिचेल स्टार्क, एश्टन टर्नर, एडम झम्पा 

Read More