Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आयसीसीकडून २०१८च्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार

आयसीसीनं २०१८ सालच्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा केली आहे. 

आयसीसीकडून २०१८च्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार

दुबई : आयसीसीनं २०१८ सालच्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा केली आहे. भारताच्या हरमनप्रीत कौरला टी-२० टीमची कर्णधार आणि न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला वनडे टीमची कर्णधार करण्यात आलं आहे. तर स्मृती मंधना आणि पूनम यादव यांची वनडे आणि टी-२० टीममध्ये निवड करण्यात आली आहे. महिला क्रिकेटपटूंनी २०१८ साली केलेल्या कामगिरीच्या आधारावर या टीमची घोषणा करण्यात आली. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतानं वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मजल मारली. या स्पर्धेमध्ये हरमनप्रीतनं १६०.५ च्या स्ट्राईक रेटनं १८३ रन केले. तर यावर्षात तिनं २५ मॅचमध्ये १२६.२ च्या स्ट्राईक रेटनं ६६३ रन केले. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीमध्ये हरमनप्रीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आयसीसीकडून हा पुरस्कार मिळाल्यामुळे मी खुश आहे, अशी प्रतिक्रिया हरमनप्रीतनं दिली आहे. या यादीत माझं नाव येणं माझ्यासाठी आश्चर्य होतं. मागच्या २ वर्षांमध्ये आम्हाला जास्त टी-२० मॅच खेळायला मिळाल्या नाहीत. त्यामुळे टीमचा आत्मविश्वास वाढवणं आणि आपण चांगली कामगिरी करु शकतो हे टीमला पटवून देणं कठीण होतं, असं हरमनप्रीत म्हणाली. या सगळ्याचं श्रेय भारतीय टीमला जात असल्याचं वक्तव्य हरमनप्रीतनं केलं. बीसीसीआयनं माझ्यावर विश्वास दाखवला. भविष्यातही मी अशाचप्रकारे चांगली कामगिरी करीन, असं हरमनप्रीत म्हणाली.

आयसीसीची वनडे टीम

स्मृती मंधना (भारत), टॅमी बेमाऊंट (इंग्लंड), सुझी बेट्स (कर्णधार, न्यूझीलंड), डेन वॅन निकर्क (दक्षिण आफ्रिका), सोफी डेव्हाईन (न्यूझीलंड), एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), मरीझेन कॅप (दक्षिण आफ्रिका), डिनद्रा डॉटीन (वेस्ट इंडिज), सना मीर (पाकिस्तान), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), पूनम यादव (भारत)

आयसीसीची टी-२० टीम

स्मृती मंधना (भारत), एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), सुझी बेट्स (न्यूझीलंड), हरमनप्रीत कौर (कर्णधार, भारत), नटाली स्किव्हर (इंग्लंड), एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया), ऍशलेघ गार्डनर (ऑस्ट्रेलिया), लिघ केसपेरेक (न्यूझीलंड), मगन स्कूट(ऑस्ट्रेलिया), रुमाना अहमद (बांगलादेश), पूनम यादव (भारत)

Read More