Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Rohit Sharma: 'अर्धशतक, शतकाने मला फरक पडत नाही'; स्वतःच्या फलंदाजीबाबत काय म्हणाला रोहित?

Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही खुल्या मनाने खेळता आणि फक्त एका शॉटचा विचार करत नाही, तेव्हा तुम्ही मैदानाच्या सर्व ठिकाणी रन्स करू शकता. ही विकेट चांगली होती आणि तुम्हाला स्वतःला शॉट्स खेळण्यासाठी तयार करायचं होतं. 

Rohit Sharma: 'अर्धशतक, शतकाने मला फरक पडत नाही'; स्वतःच्या फलंदाजीबाबत काय म्हणाला रोहित?

Rohit Sharma: टी-20 वर्ल्डकपच्या सुपर 8 मध्ये टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दिमाखात सेमीफायनल गाठली. त्यामुळे आता वर्ल्डकप जिंकण्यापासून टीम इंडिया केवळ 2 सामने दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. यावेळी रोहितने 41 बॉल्समध्ये 7 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीने 92 रन्सची खेळी केली. या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही रोहितला देण्यात आला. यावेळी रोहितने, तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता त्याच पद्धतीने फलंदाजी करायची असल्याचं म्हटलंय.

स्वतःच्या फलंदाजीबाबत काय म्हणाला रोहित?

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही खुल्या मनाने खेळता आणि फक्त एका शॉटचा विचार करत नाही, तेव्हा तुम्ही मैदानाच्या सर्व ठिकाणी रन्स करू शकता. ही विकेट चांगली होती आणि तुम्हाला स्वतःला शॉट्स खेळण्यासाठी तयार करायचं होतं. गेल्या काही वर्षांपासून मी यासाठी प्रयत्न करतोय आणि आज ते शक्य झाल्याचा मला आनंद आहे.

अर्धशतकं आणि शतकं यांनी मला फरक पडत नाही, मला जशी फलंदाजी करायची होती तशीच फलंदाजी मी केली. तुम्हाला मोठा स्कोर करायचा आहे. गोलंदाजांनी पुढचा शॉट कुठे जाईल याचा विचार करावा आणि मला वाटतं की, आज मी ते करू शकलो, असंही रोहित शर्मा म्हणाला.

जोरदार वाऱ्यामध्ये फलंदाजीबाबत रोहित म्हणाला, 'मला पहिल्या ओव्हरपासूनच वाटले की जोरदार वारा आहे. त्यामुळे मी आपला प्लॅन बदलला आणि वाऱ्याविरुद्ध गोलंदाजी केली म्हणून मला वाटलं की, ऑफ साइडलाही शॉट्स खेळावे लागतील. तुम्हाला वाऱ्याचीही काळजी घ्यावी लागेल आणि गोलंदाजही हुशार आहेत. त्यामुळे फलंदाजांना मैदानाच्या चारही बाजूंनी शॉट्स खेळावे लागतील हे समजून घ्यावे लागेल.

कुलदीप यादवविषयी काय म्हणाला रोहित?

कुलदीप काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहितीये. ज्यावेळी गरज पडेल तेव्हा आम्हाला त्याचा वापर करायचा होता. न्यूयॉर्कमधील विकेट वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होत्या. तो एका ठिकाणी चुकला, परंतु आम्हाला माहित आहे की, त्याची याठिकाणी मोठी भूमिका आहे, असं रोहितने सांगितलंय.

सेमीफायनलसाठी वेगळा प्लॅन नाही- रोहित

सेमीफायनलमध्ये आम्हाला वेगळं काही करायचं नाही. या स्पर्धेत आम्ही ज्या पद्धतीने खेळत होतो, त्याच पद्धतीने खेळायचे आहे. प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका काय आहे हे माहीत असतं. मोकळेपणाने खेळा आणि पुढे काय होईल याचा जास्त विचार करू नका. समोरच्या टीमचा अधिक विचार करू नका. आम्ही हे सातत्याने करत आलो आहोत, फक्त पुढे चालू ठेवण्याची गरज आहे. सेमीफायनल इंग्लंडविरूद्ध असून हा एक चांगला सामना होणार आहे. एक टीम म्हणून आमच्यासाठी काहीही बदलणार नाही.

Read More