Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Shane Warne Death | शेन वॉर्नचा 'बॉल ऑफ द सेंच्युरी', ज्यामुळे क्रिकेट विश्वात फिरकीची दहशत

फलंदाजांची दांडी गुल करणाऱ्या शेन वॉर्नने (Shane Warne) घेतलेल्या एका विकेटला 'बॉल ऑफ द सेंच्युरी'चा (Ball Of The Century) बहुमान मिळाला.

 Shane Warne Death | शेन वॉर्नचा 'बॉल ऑफ द सेंच्युरी', ज्यामुळे क्रिकेट विश्वात फिरकीची दहशत

संजय पाटील, झी 24 तास, मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नच्या (Shane Warne Death) निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. वॉर्न हा ख्यातनाम स्पिनरपैकी एक होता. वॉर्नने क्रिकेट कारकिर्दीत 1 हजारपैकी जास्त विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नच्या बॉलिंगचा सामना करायला सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) अपवाद वगळता अनेक फलंदाज थरथर कापायचे. (australia vs england ashes series 1993 1st test shane warne take mike gatting wickets ball of the century)

वॉर्नच्या फिरकीचा सामना करणं हे खरंच खायचं काम नव्हतं. फलंदाजांची दांडी गुल करणाऱ्या वॉर्नने घेतलेल्या एका विकेटला 'बॉल ऑफ द सेंच्युरी'चा (Ball Of The Century) बहुमान मिळाला. ही विकेट वॉर्नच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय घटना होती, जी कोणत्याही क्रिकेट चाहत्याला कधीही विसरता येणार नाही.

आजपासून 29 वर्षांआधी मॅनचेस्टरमध्ये एशेस सीरिजचं आयोजन करण्यात आलं होतं. एशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने होते.

आपल्याकडे जसं इंडिया पाकिस्तान यांच्यातील सामन्याची आवर्जून वाट पाहिली जाते, जितका थरार, सामना कोण जिंकेल याची वाटणारी भिती आणि निकालाची उत्सुकता असते, तितकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक एशेस सीरिजबाबत उत्सुकता ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांना असते.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी ही एशेज सीरिज प्रतिष्ठेची आणि सन्मानाची असते. दोन्ही संघासाठी 'करो या मरो' अशी स्थिती असते.

उभयसंघातील पहिला सामना हा 3 ते 7 जून 1993 रोजी मॅनचेस्टरमध्ये खेळवण्यात आला. इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात  289 धावा केल्या.

इंग्लंड बॅटिंगला आली. इंग्लंडला पहिला धक्का 71 धावांवर बसला. माईक अर्थटन 19 धावा करुन तंबूत परतला. यानंतर अवघ्या 9 धावांनंतर शेन वॉर्नने ही ऐतिहासिक विकेट घेतली. 

वॉर्नने इंग्लंडच्या माईक गेटिंगला (Mike Gatting)  4 धावावंर बोल्ड केलं. या विकेटला 'बॉल ऑफ द सेंच्युरी' का म्हटलं जातं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

वॉर्नने हा बॉल उजव्या हाताने खेळणाऱ्या माईक गेटिंगच्या ऑफ स्टंपवर हिट करण्यासाठी 90 अंशात फिरवला. सोप्या शब्दात सांगयचं झालं तर उजव्या हाताने खेळणाऱ्या गेटिंगच्या डाव्या बाजूला वॉर्नने बॉल टाकला, अन् हा चेंडू थेट उजव्या बाजूने फिरत गेटिंगच्या दांड्या उडवल्या. 

बॅट्समनला वाटलं की हा वाईड बॉल असेल, दिला सोडून जाईल निघून. पण कसलं काय, झालं भलतचं. समोर बॉल टाकणारा शेन वॉर्न होता गल्ली क्रिकेटमधला बॉलर नाही, याचा विसर कदाचित गेटिंगला पडला आणि त्याने बॉल सोडला. मग काय घडला इतिहास. लेग साईडला पडलेला हा बॉल कधी ऑफ साईडच्या दिशेने वळला आणि बेल्स पडल्या, हे स्वत: त्या गेटिंगलाही कळलं नाही.

वॉर्नने टाकलेल्या या डिलव्हरीला 'बॉल ऑफ द सेंच्युरीचा मान मिळाला. तेव्हापासून वॉर्नच्या फिरकीची दहशत आणखी पसरली. वॉर्नने या सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच जाहीर करण्यात आलं. विशेष म्हणजे वॉर्नने या मालिकेत हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला होता.
                                
700 विकेट्स घेणारा पहिला बॉलर 

शेन वॉर्नने क्रिकेट कारकिर्दीत 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स तर 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट्स घेतल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याबाबत वॉर्नचा श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीथरननंतर दुसरा क्रमांकावर होता. कसोटीमध्ये मुरलीथरनच्या नावे 803 विकेट्स आहेत. तर वॉर्नच्या नावे 708 विकेट्सची नोंद आहे. 

शतकाशिवाय सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड 

वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार 154 धावा केल्या होत्या. वॉर्नने या धावा करताना एकही शतक लगावलं नव्हतं. वॉर्नच्या नावे कसोटीमध्ये शतकाशिवाय इतक्या धावा  करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.  वॉर्नने कसोटीमध्ये 12 अर्धशतकं केली आहेत. वॉर्नची कसोटीमध्ये 99 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. वॉर्नने ही खेळी 2001 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात केली होती. हा सामना पर्थमध्ये खेळवण्यात आला होता.  

Read More