Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आशिया कप 2018 : बांग्ला टायगर्सवर मात करत टीम इंडिया सातव्यांदा खिताब पटकावणार?

आशिया चषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला बांग्ला टायगर्सच्या आव्हानाला सामोर जावं लागणार आहे. पाकिस्तानला परास्त करत बांग्लादेशनं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यामुळे बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.

आशिया कप 2018 : बांग्ला टायगर्सवर मात करत टीम इंडिया सातव्यांदा खिताब पटकावणार?

मुंबई : आशिया चषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला बांग्ला टायगर्सच्या आव्हानाला सामोर जावं लागणार आहे. पाकिस्तानला परास्त करत बांग्लादेशनं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यामुळे बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.

जगभरातील क्रिकेटप्रेमी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज मुकाबल्याची अपेक्षा करत होते. मात्र, बांग्लादेशनं पाकिस्तानला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे आता आशिया चषकात भारत आणि बांग्लादेश यांच्या अंतिम फेरीची लढत रंगणार आहे.

या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियानं एकही सामना गमावलेला नाही. केवळ अफागाणिस्तानविरुद्धचा सामना हा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे या सामन्यातही रोहित शर्माच्या भारतीय संघाचचं पारडं जड असेल. बांग्लादेशच्या संघानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे टीम इंडियाला बांग्ला टायगर्सपासून सावध रहावं लागेल. 
 
भारत आणि बांग्लादेश यांच्यात आतापर्यंत एकूण ३४ एकदिवसीय सामने खेळले गेलेत. यामध्ये भारतानं २८ वेळा बाजी मारलीय. तर बांग्लादेशला पाच सामने जिंकण्यात यश आलंय. टीम इंडियाला सातव्यांदा आशिया चषक जिंकण्याची संधी आहे. तर गेल्या चार आशिया चषकात बांग्लादेशची अंतिम फेरी गाठण्याची ही तिसरी वेळ आहे. 

दरम्यान, भारतानं याआधी बांग्लादेशला २०१५ च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केलंय. तसंच २०१६ च्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं बांग्लादेशला पराभूत करत अंजिक्यपद पटकावलं होतं. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही बांग्लादेला भारतीय संघाकडून पराभव सहन करावा लागला होता. तसंच याच वर्षी झालेल्या निदहास ट्रॉफीतही भारतानं बांग्लादेशवर मात केली होती. 

टीम इंडियानं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केलीय. शिखर धवन आणि कर्णधार रोहित शर्मा तुफान फॉर्ममध्ये आहेत. आता अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत टीम इंडिया पुन्हा एकदा आशिया चषक जिंकण्यास उत्सुक आहे.

Read More