Marathi News> भविष्य
Advertisement

बुधवारी खग्रास चंद्रग्रहण - सुपरमून - ब्ल्यूमूनचा तिहेरी योग एकत्र

येत्या बुधवारी दि. ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे आपणा सर्वास साध्या  डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होणार असल्याचे खगोलअभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. १५२ वर्षांपूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी असाच चंद्रग्रहण, ब्ल्यूमून आणि सुपरमून दर्शनाचा योग आला होता. 

बुधवारी खग्रास चंद्रग्रहण - सुपरमून - ब्ल्यूमूनचा तिहेरी योग एकत्र

मुंबई : येत्या बुधवारी दि. ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे आपणा सर्वास साध्या  डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होणार असल्याचे खगोलअभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. १५२ वर्षांपूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी असाच चंद्रग्रहण, ब्ल्यूमून आणि सुपरमून दर्शनाचा योग आला होता. 

सूपरमून म्हणजे काय ? 

 ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी त्याला ‘ सुपरमून ‘ म्हणतात. मात्र ‘ सुपरमून ‘ ही संज्ञा खगोलशास्त्रीय नाही. रिचर्ड नोले यांनी १९७९ मध्ये हे नाव दिले. अशावेळी चंद्रबिंब  १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. 
 
 चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५९ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे.

 
 ब्ल्यूमून दिसणार  

एका इंग्रजी महिन्यात ज्यावेळी दोन पौर्णिमा येतात त्यावेळी दुसर्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हणतात. जरी त्याला ब्ल्यू मून म्हटले गेले असले तरी त्यावेळी चंद्र काही ‘ ब्ल्यू ‘ रंगाचा दिसत नाही. यावेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हटलेले आहे.

खग्रास चंद्रग्रहण

 बुधवार , ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतातून ते खग्रास स्थितीत दिसणार आहे. बुधवार, ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा तिहेरी योग आला आहे. म्हणून खगोलप्रेमींच्या दृष्टीने ही एक पर्वणी आहे. छायाचित्रकारांना ही एक मौल्यवान संधी आहे.

चंद्रग्रहण कधी होणार सुरू ?  

बुधवार, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. म्हणजे चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितीजाच्या खाली असल्याने आपणास दिसू शकणार नाही. नंतर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल आणि आपणासर्वास साध्या डोळ्यांनी सुपर-ब्ल्यू-ब्लडमूनचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने पौर्णिमा असूनही चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगाचे दिसते. म्हणून त्याला ‘ ब्लड मून ‘ म्हणतात.

ग्रहण सायंकाळी सात वाजता आहे. त्यावेळी चंद्रबिंब पूर्व आकाशात बरेच वरती आलेले दिसेल. खग्रास  स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण सुटेल, चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर येईल .

 

कधी पहाल चंद्राचे विलोभनीय रूप ?  

बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून रात्री सात वाजून अडतीस मिनिटांपर्यंत पूर्व आकाशात साध्या डोळ्यांनी सुपर, ब्ल्यू, ब्लडमूनचे आपणास विलोभनीय दर्शन घेता येईल. 

 

पुन्हा हा योग कधी येणार ? 

 आता यानंतर २६ मे २०२१ रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण असा योग येईल. ३१ डिसेंबर २०२८ रोजी ब्ल्यूमून आणि चंद्रग्रहण असा योग येईल. दि. ३१ जानेवारी २०३७ रोजी पुन्हा तिहेरी योग आल्याने सुपर-ब्ल्यू- ब्लड मूनचे दर्शन घेता येईल असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. 

 
 तिहेरी योगाचे काय परिणाम होतील ? 

 
दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोष्टींचे कोणतेही वाईट परिणाम होणार नाहीत. उलट चांगलेच परिणाम होतील . खगोलप्रेमींना हे दृश्य पाहून आनंद अनुभवता येईल आणि सामान्य लोकांनाही हे दृश्य पाहून खगोलशास्त्र शिकावेसे वाटेल. पालक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हे चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी अधिक माहिती द्यावी असे आवाहनही श्री. सोमण यांनी केले.

Read More