Marathi News> भविष्य
Advertisement

श्रावणातील उत्सव, व्रते अधिकमासात करावीत की निजमासात? दा. कृ. सोमण यांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

Adhik Maas Marathi Information: मंगळवार, 18 जुलैपासून बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास असून सर्वाधिक सणवार असलेला महिनाच अधिकचा महिना असल्याने अनेकांचा संभ्रम झाला असून नेमके हे उत्सव कधी करावेत असा प्रश्न पडला आहे. याचेच उत्तर जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलं आहे.

श्रावणातील उत्सव, व्रते अधिकमासात करावीत की निजमासात? दा. कृ. सोमण यांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

Adhik Maas Marathi Information: यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये मंगळवार, 18 जुलैपासून बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास येणार आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिक मासामध्ये सण-उत्सव-व्रते करावीत की निज श्रावणमासामध्ये करावीत? श्रावणामध्ये कांदा, लसुण न खाणाऱ्यांनी अधिकमासामध्येही या नियमांचं पालन करावं का? सर्वाधिक सणवार असलेला श्रावणच यंदा अधिक मास म्हणून येणार असल्याने अनेकांचा गोंधळ झाला आहे. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहेत.

सर्व सण-उत्सव- व्रते अधिकमासात न करता निज श्रावणमासातच करा

यावर्षी मंगळवार 18 जुलैपासून बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास येणार आहे. अधिकमासाला  पुरुषोत्तममास , मलमास किंवा धोंड्या महिना असेही म्हणतात. अधिक श्रावणमासानंतर गुरुवार, 17 ॲागस्ट ते शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 पर्यंत निज श्रावणमास येणार आहे. श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन, नागपंचमी वगैरे श्रावण महिन्यातील सर्व सण-उत्सव- व्रते ही अधिक श्रावणमासात न करता निज श्रावणमासातच करावयाची आहेत, असं दा. कृ. सोमण यांनी म्हटलं आहे.

अधिकमास म्हणजे काय?

पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास व दुसरा तो निजमास म्हणून धरला जातो, असं दा. कृ. सोमण सांगतात.

...त्यामुळे अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी दोन नावे

अधिकमास समजून सांगताना दा. कृ. सोमण यांनी यंदाच्या वर्षीचं उदारण दिलं आहे. "आता यावर्षीच पहा. रविवार 16 जुलै 2023 रोजी उत्तररात्री 5 वाजून 6 मिनिटांनी सूर्य कर्क राशीत प्रवेश करीत आहे. नंतर गुरुवार 17 ॲागस्ट रोजी  दुपारी 1 वाजून  32 मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करीत आहे. या कालात 2 चांद्र महिन्यांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी दोन नावे देण्यात आली आहेत. आपणास असेही सांगता येते की, ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिक महिना धरला जातो. यावर्षीच पहा. मंगळवार 18 जुलै 2023 ते बुधवार 16 ॲागस्ट 2023 या कालात सूर्याचा राशीबदल झालेला नाही. त्यामुळे श्रावण हा चांद्र महिना अधिकमास झाला आहे," असं दा. कृ. सोमण म्हणाले.

भोजनासंदर्भातील नियमही निजमासातच पाळा

निजमास म्हणजेच गुरुवार, 17 ॲागस्ट ते शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 पर्यंत जो श्रावण महिना असेल त्यामध्येच श्रावणातील सर्व सणवार, उत्सव साजरे करावेत. जेवणासंदर्भात श्रावण महिन्यात पाळले जाणारे काही विशिष्ट नियमही निजमासामध्येच पाळावेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More