Marathi News> उत्तर महाराष्ट्र
Advertisement

जनतेच्या हितासाठी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार- उद्धव ठाकरे

आता दिवाळीचे फटाके बाजूला ठेवूयात आणि चांगले दिवे लावूयात.

जनतेच्या हितासाठी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार- उद्धव ठाकरे

नाशिक: शिवसेना सत्तेत राहून सरकारवरच टीका करते, असा अनेकांचा आक्षेप आहे. मात्र, मी सरकारवर टीका करत नाही तर जनतेच्या बाजूने बोलतो. जनतेच्या हितासाठी मी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते शनिवारी निफाड येथील विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनदेखील उपस्थित होते. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी  गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाविषयी भाष्य केले. आता दिवाळीचे फटाके बाजूला ठेवूयात आणि चांगले दिवे लावूयात, असे सूचक विधान त्यांनी केले. लवकरच आपण राम मंदिराच्या भूमीपूजनाला एकत्र जाऊया, असेही उद्धव यांनी म्हटले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी समोपचाराची भाषा सुरू केल्याची चर्चा आहे. 

यावेळी उद्धव यांनी कर्जमाफी आणि दुष्काळाच्या निर्णयांचा फेरआढावा घेण्याची मागणीही केली. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर त्याचा लाभ किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला हेदेखील बघायला पाहिजे. कर्जमाफी मिळवताना शेतकऱ्यांना येणाऱ्या पात्र, अपात्रेतच्या अडचणींकडेही लक्ष पुरवले पाहिजे. सरकारने मोठ्या योजना जरूर जाहीर कराव्यात. मात्र, त्या पूर्ण होण्याचा कालावधीही निश्चित केला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी ओझर विमानतळावरून निफाडपर्यंत उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवासही केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीकेची झोड उठवणारे उद्धव ठाकरे आता भाजपच्या मंत्र्यांसोबत एकाच मंचावर आले आणि समोपचाराची भाषा सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा युतीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Read More