Marathi News> उत्तर महाराष्ट्र
Advertisement

अरेरे! फॅशनेबल राहणे हा गुन्हा आहे का?

टवाळखोरांना कंटाळून तिने केली आत्महत्या  

अरेरे! फॅशनेबल राहणे हा गुन्हा आहे का?

मालेगाव : तंत्रज्ञान आणि शिक्षणामुळे जग आज किती पुढं गेलं आहे. मात्र, काही जणांना हे पुढं जाणं नकोस असतं. त्यांना हवं असतं ते चाकोरीतलं जगणं. पण, आपल्याला जे पटत नाही, ते दुसऱ्यानं करू नये हा अट्टाहास का? काही टवाळखोरांच्या याच अट्टाहासामुळं एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला.

हि घटना आहे, मालेगांवच्या जाफरनगर भागातली. आशिया व जाफरीन या दोघी बहिणी येथे ब्युटी पार्लर चालवतात.  त्यामुळे त्यांचं राहणीमान फॅशनेबल होतं. पण, त्यांच्या या फॅशनेबल राहणीमानाचा काही टवाळखोरांना राग येत असे.

या दोघी बहिणी ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास निघाल्या की हे टवाळखोर त्यांना भर रस्त्यात अडवायचे, फॅशनेबल का राहतात असे विचारून त्यांची छेडछाड काढायचे. या बहिणींनी जणू काही मोठा गुन्हा केला अशा स्वरूपात त्यांना वागणूक दिली जायची.

परिसरातील अनेक जण उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहायचे. पण, त्या टवाळखोरांना रोखण्याची हिंम्मत कुणी करत नव्हते. पुढे तर हे प्रकार आणखी वाढू लागले. तेव्हा त्यांनी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रारही दाखल केली.

मात्र, पोलिसात तक्रार केली म्हणून या टवाळखोरांनी त्यांच्या घरात घुसून त्या बहिणींच्या कुटूंबाला देखील मारहाण केली होती. अखेर, या छेडछाडीला कंटाळून आशिया मोहंमद कासीम या 20 वर्षीय युवतीने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तिच्या कुटुंबांने तिला खासगी रुगणालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान आशियाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रूढी परंपरेने बुरसटलेल्या विचारांनी आशियाचा बळी गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तर, निष्पाप आशियाचा बळी घेणाऱ्या टवाळखोर तरुणांना कठोर शासन करावे असा आक्रोश आशियाचे कुटुंबीय करीत आहेत.

Read More