Marathi News> उत्तर महाराष्ट्र
Advertisement

'चार काळे फुगे उडवायचे, कोंबड्या हवेत भिरकावयाच्या, ही काय आंदोलनं झाली'

आजची सभा खूप मोठी होईल. नाशिकमध्ये कधी एवढी मोठी सभा झालीच नसेल

'चार काळे फुगे उडवायचे, कोंबड्या हवेत भिरकावयाच्या, ही काय आंदोलनं झाली'

नाशिक: राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विरोधकांना डिवचले. आमच्या काळात आम्ही विरोधक म्हणून कसं आंदोलन करायचो. नाहीतर आता विरोधकांकडून हवेत चार काळे फुगे उडवल्या जातात, कडकनाथ कोंबड्या हवेत भिरकावल्या जातात. ही काय आंदोलनं झाली, असा चिमटा गिरीश महाजन यांनी विरोधकांना काढला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा गुरुवारी नाशिकमध्ये समारोप होत आहे. यानिमित्ताने आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आजची सभा खूप मोठी होईल. नाशिकमध्ये कधी एवढी मोठी सभा झालीच नसेल, असा दावाही महाजन यांनी केला. 

तसेच या सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची धरपकड करण्यात आल्याच्या आरोपाविषयी त्यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा आपल्याकडे अशी काही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, आमच्या काळात आम्ही विरोधक म्हणून कसं आंदोलन करायचो? हे काय चार काळे फुगे उडवायचे, कडकनाथ कोंबड्या हवेत भिरकावयाच्या, ही काय आंदोलनं झाली का, असा सवाल गिरीश महाजन यांनी विचारला.

दरम्यान, मोदींच्या आजच्या सभेसाठी नाशिकमध्ये कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल. परंतु, या सभेत शेतकऱ्यांकडून कांदा फेकून निषेध होऊ शकतो. त्यामुळे सभास्थळी कांदा आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्याचीही परवानगी नसल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

Read More