Marathi News> उत्तर महाराष्ट्र
Advertisement

नाशिकमध्ये भाजपला बंडाळीचा पहिला धक्का; वसंत गीते काँग्रेसच्या वाटेवर?

सध्या गीते समर्थक आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाटाघाटीची बैठक सुरु असल्याचे समजते.

नाशिकमध्ये भाजपला बंडाळीचा पहिला धक्का; वसंत गीते काँग्रेसच्या वाटेवर?

नाशिक: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली उमेदवारी जाहीर केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे नाराजांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यामध्ये नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे वसंत गीते हे भाजपमधून बाहेर पडणार आहेत. 

विशेष म्हणजे वसंत गीते यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून उमेदवारीची ऑफर देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वसंत गीते यापैकी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारू शकतात. काँग्रेसकडून त्यांना नाशिक मध्य मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. सध्या गीते समर्थक आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाटाघाटीची बैठक सुरु असल्याचे समजते. 

याशिवाय, भाजपचे माणिकराव कोकाटे हेदेखील बंड करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना सिन्नर मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते. 

शिवसेना - भाजप युतीला बंडखोरीचे ग्रहण, हे बंडाच्या तयारीत

शिवसेना-भाजपमधील जागावाटपानुसार भाजपच्या वाट्याला १६४ जागा आल्या आहेत. भाजपकडून मंगळवारी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यानंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये उमेदवारीची आस लावून बसलेले नेते नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, दिलीप कांबळे आणि प्रकाश मेहता यांनादेखील पहिल्या यादीत स्थान नाही. त्यामुळे या बड्या नेत्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

Read More