Marathi News> मुंबई
Advertisement

पोलीस भरती घोटाळाप्रकरणी झी २४ तासचा दणका, गृहमंत्र्यांनी दिले चौकशी करून कारवाईचे आदेश

राज्यात टीईटी घोटाळा, म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळ्यानंतर आता पोलीस भरतीतला घोटाळा उघड

पोलीस भरती घोटाळाप्रकरणी झी २४ तासचा दणका, गृहमंत्र्यांनी दिले चौकशी करून कारवाईचे आदेश

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : Police recruitment scam : राज्यात टीईटी घोटाळा, म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळा अशी घोटाळ्यांची मालिका सुरूच असतानाच आता आणखी एक भरती घोटाळा उघड झाला आहे. मुंबईतल्या पोलीस भरतीतलं मोठं गौडबंगाल झी २४ तासच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झालं आहे.

झी २४ तासच्या बातमीची गृहमंत्र्यांनी घेतली दखल
झी 24 तासने पोलीस भरतीत झालेला घोटाळा उघडकीस आणल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिलेयत. चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

काही प्रकरणं पुढे आलेली आहेत, पोलीस भरतीवेळी स्वत: त्या ठिकाणी परीक्षा देण्याऐवजी डमी उमेदवार बसवून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. पण पोलीस भरती परीक्षा ही पूर्णपणे पारदर्शक असून कोणीही दोषी असेल त्याची गैर केली जाणार नाही, दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

काय आहे पोलीस भरती घोटाळा प्रकरण?
शिक्षण, आरोग्य विभागापाठोपाठ आता मुंबईतला पोलीस भरती घोटाळा उघड झालाय. घोटाळेबाजांनी चक्क मूळ उमेदवारांऐवजी डमी उमेदवार उभे करून बोगस भरती केल्याचं समोर आलंय. मुंबई पोलीस दलात 14 नोव्हेंबरला 1076 शिपाई पदांसाठी भरती करण्यात आली. 
त्यासाठी 6 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत उत्तीर्ण उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. मात्र पोलिसांनी या चाचणीचं व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासलं असता धक्कादायक वास्तव समोर आलंय. शाररिक क्षमता नसलेल्या उमेदवारांच्या जागी दुस-याच उमेदवारांना उभं करण्यात आलं होतं. या पोलीस भरती घोटाळयाप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आलीय. तर 8 जण फरार आहेत.

काय होती मोडस ऑपरेंडी ? 
घोटाळेबाजांनी मैदानी परीक्षेसाठी डमी उमेदवार उभे केले. मूळ उमेदवार आणि डमी उमेदवार यांच्यातला फरक दिसू नये यासाठी मिळत्या जुळत्या चेहऱ्याचे तरुण शोधले जायचे. दोघांची शरीरयष्टी सारखीच असेल याची काळजी घेतली जायची. मात्र पोलीसांनी मैदानी परीक्षेचे व्हिडीओ तपासले असता त्यात मूळ उमेदवाराचा चेहरा नितळ तर डमी उमेदवाराच्या चेह-यावर व्रण असल्याचं दिसून आलं आणि बोगस पोलीस भरतीचा पर्दाफाश झाला. बहुतांश आरोपी बीड आणि औरंगाबादचे असल्याचं उघड झालंय. 

ज्या पोलिसांवर कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांनीच गैरमार्गानं पोलीस दलात प्रवेश केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. आता या घोटाळेबाजांना खाकीचा सहवास तर मिळेल मात्र तुरूंगात.

Read More