Marathi News> मुंबई
Advertisement

यशवंत जाधव म्हणजे उद्धव ठाकरेंचा पालिकेतील फंड कलेक्टर, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मविआतल्या डर्टि डझनमध्ये आणखी दोघंजण, किरीट सोमय्यांनी सांगितली नावं

यशवंत जाधव म्हणजे उद्धव ठाकरेंचा पालिकेतील फंड कलेक्टर, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि  मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर केंद्रीय तापस यंत्रणेने छापा मारला आहे. याबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यशवंत जाधव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला.

काल जी बारा नावं वाचली होती, अनिल परब, संजय राऊत, सुजीत पाटकर, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड अशी दहा नवा वाचली होती. दोन नाव जी आहेत त्यात अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तर गेले. 

हे दोघं सोडून डर्टी डझनमध्ये (dirty dozen) राहिलेली दोन नावं म्हणजे यशवंत जाधव आणि दुसरं नाव म्हणजे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar). या डर्टी डझनचे घोटाळे सिद्ध झालेले आहेत, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

यांच्यावर लोकायुक्त, हायकोर्ट, ईडी आणि इन्कम टॅक्सच्या केसेस आहेत. हे घोटाळे सिद्ध झाले आहेत, पुरावे खरे आहेत, या संबंधित काही लोकांनी मान्य केलेलं आहे. काही लवकरच मान्य करतील.

मुंबईच्या महापौर आणि त्यांच्या कंपनीने मान्य केलं आहे की आम्ही फॉर्जरी केलेली आहे. एसआरएच्या सदनिका ढापल्या आहेत. अशाच पद्धतीने यशवंत जाधव ज्याचं नाव काल राहिलं होतं. आज त्यांच्यावर इन्कमटॅक्स विभागाची कारवाई सुरु झाली आहे. गेले वर्षभर आम्ही याचा पाठपुरावा करत होतो. ६ जानेवारीला मी मंत्रायल, इन्कम टॅक्स, ईडी अशा सगळ्यांच्या भेटी घेतल्या होत्या.

यशवंत जाधव यांचं उदाहरण हे शिवसेनेसाठी आदर्श आहे. यशवंत जाधव ज्या पद्धतीने मनी लॉन्ड्रींग करतात, त्याच लाईनवर उद्धव ठाकरे यांचं कुटुंबही गेलं. अनिल परबही त्याच लाईनीवर गेले, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी जो फॉर्म भरला तिथूनच  १९ बंगल्यांची कहाणी सुरु झाली. त्या फॉर्ममध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली मालमत्ता घोषित केली. त्यात १९ बंगल्यांची माहिती उद्धव ठाकरे यांनी लपवली.

यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनीही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता लपवली. यासंबंधी काही माहिती इन्कम टॅक्स विभागाला मिळाली. काही माहिती आमच्या सारख्या अॅक्टिव्हिस्टने दिली. यशवंत जाधव यांनी दुबईत सिनर्जीत व्हेंचर्स आणि सईद डोन शारजा या २ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या दोन्ही कंपन्या यशवंत जाधव कुटुंबियांच्या असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. 

महापालिका कंत्राटदारांकडून यांना रोकड्यात पैसे मिळतात. त्यांचा जो हवाला ऑपरेटर आहे उदयशंकर महावर आहे. हा जो व्यक्ती आहे तो गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे. यातून उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचे संबंध उघड होतात. 

यशवंत जाधव म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर असल्याची टीका किरिटी सोमय्या यांनी केली आहे. यशवंत जाधव यांचा हवाला ऑपरेटर उदयशंकर महावर यांनी ही माहिती दिली आहे की यशवंत जाधवचा माणून रोकडे पैसे द्यायचा. यातला काही पैसा युएईला पाठवण्यात आला, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

आज इन्कम टॅक्सने अखेर कारवाई सुरु केली आहे. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, पण किरीट सोमय्या, मेधा सोमय्या आणि नील सोमय्याचा एका दमडीचा भ्रष्टाचार सापडला नाही. पोलीस आयुक्तांवर दवाब टाकत नील सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितलं, एक महिला बेल मिळता कामा नये असंही त्यांना सांगण्यात आलं. पण उद्धव ठाकरे तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही. तुमच्या डर्टी डझनचे घोटाळे बाहेर काढणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. 

Read More