Marathi News> मुंबई
Advertisement

राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार का? मातोश्रीऐवजी शिवतीर्थावर का जातायत भाजपचे नेते

मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय का?

राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार का? मातोश्रीऐवजी शिवतीर्थावर का जातायत भाजपचे नेते

Maharashtra Politics : भाजपनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता या दोन नेत्यांची भेट झाली. पण यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवी चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार का?

राजकारणात मातोश्रीचा दरारा
बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना मातोश्रीचा एक वेगळा दरारा होता. मुंबईत दौऱ्यावर येणारी कोणतीही बडी असामी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला जायची. अगदी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार देखील. युपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले होते. 

मातोश्रीवरुन दिल्या जाणाऱ्या एका आदेशाने कधीही न थांबणारी मुंबई एका क्षणात थांबत होती. क्रिकेटच्या खेळपट्ट्या उखडल्या जात होत्या, तर चित्रपटाचे खेळही रद्द होत होते. गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्री हे राज्यातल्या राजकारणातील महत्वाचं स्थान बनलं.

मातोश्रीचा दरारा कमी झाला?
पण आता चित्र बदलतंय. शिवसेना खासदारांच्या दबावामुळं उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मुर्मू देखील ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर जातील, अशी अपेक्षा होती.  मात्र मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणं टाळलं. यानिमित्तानं भाजपनं उद्धव ठाकरेंचं राजकीय महत्त्व कमी झाल्याचं दाखवून दिलंय. 

अनेक भाजप नेते थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर रावसाहेब दानवे या आणखी एका केंद्रीय मंत्र्याने प्रत्यक्ष शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे, कृपाशंकर सिंह, प्रसाद लाड यांनीही शिवतीर्थावर हजेरी लावली.

आता तर सलग दुसऱ्यांदा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. 
दोन दिवसांपूर्वी पावसामुळे ही भेट रद्द झाली होती. नवीन सत्ता स्थापनेनंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटू असं फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सांगितलं होतं. 

त्यानंतर आज सकाळी वाजता या दोघांची भेट झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्ताराची उत्कंठा असताना झालेल्या या प्रदीर्घ चर्चेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात. 

मनसेच्या एकमेव आमदाराला मंत्रीपद?
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मसनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना भाजप कोट्यातून मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराला आपलं मत दिलं होतं. त्यामुळे भाजप-मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं होतं. 

Read More