Marathi News> मुंबई
Advertisement

विधानसभा अध्यक्षपद : बहुमत असूनही महाविकासला कसोटी सामना जिंकणे अवघड

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक होणार आहे.

विधानसभा अध्यक्षपद : बहुमत असूनही महाविकासला कसोटी सामना जिंकणे अवघड

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक होणार आहे. मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला ही निवडणूक होईल. मात्र बहुमत असूनही या निवडणुकीत महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे. 

- नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त
- रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक होणार 
- निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फोडण्याचा भाजप प्रयत्न करू शकते
- त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीची कसोटी पाहणारी ठरणार

सरकार स्थापन करताना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष मतदान झालं होतं. हेड काऊंट म्हणजेच विधानसभेत उभं राहून आमदारांनी मतदान केलं होतं. प्रत्यक्ष बहुमत सिद्ध करण्यापूर्वी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये शक्तीपात केलं, तेव्हा तीनही पक्षांचे मिळून १६२ आमदार होते. आम्ही १६२ अशी एकजूट तेव्हा या पक्षांनी दाखवली होती. 

मात्र प्रत्यक्ष बहुमत सिद्ध करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला विधानसभेत १७१ आमदारांनी पाठिंबा दर्शवला होता. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षदासाठी आता १ मार्च रोजी सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवडणूक होणार आहे. 

या निवडणुकीत महाविकास आघाडीला आपले १७१ चे संख्याबळ कायम ठेवावं लागणार आहे. त्यासाठी आपलं एकही मत फुटू नये, याची काळजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच काँग्रेसच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे भाजपचीच मतं फोडण्याचा दावा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष करतायत. 

सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून हे सरकार लवकरच कोसळेल असे दावे केले जात होते. मात्र मागील काही महिन्यांपासून भाजपने हा दावा करणं बंद केलं आहे. म्हणजे सरकार आता कुठे स्थिरस्थावर होतंय. त्यातच काँग्रेसने नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक लादली असून त्याबाबत नाराजीचा सूर आहे. 

तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही भाजपकडून केला जातोय. आपला हा दावा काही अंशी खरा करण्यासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काही आमदारांची मतं फोडण्याचा जोरदार प्रयत्न करणार, तर एकही आमदार फुटू नये यासाठी महाविकास आघाडीला सतर्क राहवं लागणार आहे. 

महाविकास आघाडीच्या काही आमदारांची मतं फोडण्यात जर भाजपला यश आलं तर आपलं १७१ चं संख्याबळ महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दाखवू शकत नाही. जर असं झालं तर ती महाविकास आघाडीसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी मोठी नामुष्की असेल. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीला योग्य व्यूहरचना आणि नियोजन करून लढवावी लागणार आहे. 

 

Read More