Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईतील 9 केंद्रांमध्ये 12,500 आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरण

 देशात करोना लसीकरणाची सुरुवात उद्यापासून

मुंबईतील 9 केंद्रांमध्ये 12,500 आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरण

मुंबई : देशात करोना लसीकरणाची सुरुवात उद्यापासून (१६ जानेवारी) होणार आहे. लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबईतील 9 केंद्रांमध्ये जवळपास 12,500 आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरण करण्यात येणार आहे. एफ दक्षिण प्रभागातून लसीकरणाच्या कुप्यांचं वाटप होणार असून महापालिकेच्या लोकमान्य टिळक, नायर, केईएम, कूपर, कांदिवलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरचं राजावाडी, सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई, वांद्र्यातील भाभा रुग्णालय आणि बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

केईएम रुग्णालयात दररोज 1000 ते 1200 व्यक्तींवर लसीकरण होणार आहे. बुथवर तज्ज्ञांसह पाच जणांचा गट तयार करण्यात आला आहे. मुंबईत आधीच लसी दाखल झाल्या असून ते परळमधील आरोग्यखात्याच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात आला आहे. 

देशभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर लस आल्याने दिलासा मिळाला आहे. भारतात २ लसींच्या वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 'सीरम इन्स्टिट्यूट' आणि 'भारत बायोटेक' च्या लसींना आपत्कालीन वापरास परवानगी दिल्यानंतर शनिवार प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी लस पोहोचल्या आहेत. तयारी देखील जवळपास पूर्ण झाली असून उद्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

पंतप्रधान मोदी लसीकरणाच्या आधी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. भारतात तयार झालेल्या लसींची मागणी आता परदेशातूनही होऊ लागली आहे. भारतात आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना आधी लस दिली जाणार आहे.

Read More