Marathi News> मुंबई
Advertisement

हिंदुत्व कालही, आजही आणि उद्याही - उद्धव ठाकरे

उल्लेखनीय म्हणजे, महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर दिवंगत शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांचा पोस्टरवर आणि शपथविधीवेळीही 'हिंदुहृदयसम्राट' असा उल्लेख करणं शिवसेनेनं टाळलंय

हिंदुत्व कालही, आजही आणि उद्याही - उद्धव ठाकरे

मुंबई : 'हिंदुत्व कालही होतं, आजही आहे, उद्याही राहील' अशी स्पष्टोक्ती शिवसेना पक्षप्रमुख आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी विधानसभेत दिलीय. याचसोबत त्यांनी आत्ताही आपण हिंदुत्वाच्या विचारधारेसोबत असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. दिलेला शब्द पाळणं हे आमचं हिंदुत्व, अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) यांना फटकारलंय. याचसोबत, मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलोय आणि मी त्यांचा नेहमीच मित्र राहीन, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर दिवंगत शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांचा पोस्टरवर आणि शपथविधीवेळीही 'हिंदुहृदयसम्राट' असा उल्लेख करणं शिवसेनेनं टाळलंय. 

'मी एक भाग्यशाली मुख्यमंत्री आहे कारण जे माझा विरोध करत होते ते आता माझ्याचसोबत आहेत आणि मी ज्यांच्यासोबत होतो ते सध्या विरोधीपक्षात बसलेत... मी इथं माझं भाग्य आणि लोकांच्या आशीर्वादानं पोहचलोय... मी कुणालाही म्हटलेलं नव्हतं की मी इथं येईन... पण मी आलोय' असंही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपनं दोन दिवसांपूर्वी विधीमंडळाकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव विधीमंडळानं एकमतानं मंजूर केला गेला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सदस्यांनी फडणवीसांचं त्यांच्या जागेवर जाऊन अभिनंदन केलं. 

'मी देवेंद्र फडणवीस यांना कधीही विरोधी पक्षनेता म्हणणार नाही... मी तुम्हाला (देवेंद्र फडणवीस) विरोधी पक्षनेता नाही तर एक जबाबदार नेता म्हणेन' असंही सदनात बोलताना उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं. 'जर तुम्ही आमच्यासोबत असता तर आज हे सगळं झालं नसतं...' असा टोला हाणायलाही ते विसरले नाहीत.  

 

Read More