Marathi News> मुंबई
Advertisement

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, शुभेच्छांचं राजकारण, वाढदिवस पक्षप्रमुखांचा की माजी मुख्यमंत्र्यांचा?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वाढदिवसानिमित्ताने दिलेल्या शुभेच्छांची राज्यात चर्चा

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, शुभेच्छांचं राजकारण, वाढदिवस पक्षप्रमुखांचा की माजी मुख्यमंत्र्यांचा?

Maharashtra Politics : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसा निमित्ताने मातोश्री फुलाफुलांनी सजलं होतं. साक्षात पक्षप्रमुखांचा वाढदिवस असल्यानं शिवसैनिकांच्या उत्साहाला आणखीच उधाण आलं होतं.  

यंदा मला हारतुरे, पुष्पगुच्छ नकोत, कोरड्या शुभेच्छाही नकोत,  तर शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञापत्रं गिफ्ट म्हणून द्या, असं आवाहन ठाकरेंनी केलं होतं. आणि अर्थातच शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे देऊन ठाकरेंना मनासारखं बर्थडे गिफ्ट दिलं.

पण या उत्साही आणि उत्सवी वाढदिवस सोहळ्याला राजकारणाचं गालबोट लागलं नसतं तरच नवल. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि ठाकरे सरकार कोसळल्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख करत, शरद पवारांनी नव्या संकल्पांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (CM Eknath Shinde) गट नेमक्या काय शुभेच्छा देणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांना शुभेच्छा तर दिल्या. पण उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळल्यानं त्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

त्यांचाच कित्ता शिंदे गटात असलेले आमदार सांदिपान भुमरे, शंभूराज देसाई, उदय सामंत, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, यामिनी जाधव आदींनीही गिरवला. 

याला माजी मंत्री गुलाबराव पाटील, खासदार राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे आणि हेमंत गोडसे हे अपवाद ठरले. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री असे दोन्ही उल्लेख त्यांनी केले. मात्र शिंदे गटात असलेले खासदार राहुल शेवाळे आणि कृपाल तुमाने यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दै. सामनाला जाहिरात दिली होती.  जाहिरातीत राहुल शेवाळेंचा शिवसेना लोकसभा गटनेते असा उल्लेख असल्यानं ही जाहिरात सामनानं नाकारल्याचा आरोप शेवाळेंनी केलाय. 

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलं. आता शिंदेंना पक्षप्रमुख व्हायचंय, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केली होती. शिंदे गटानं ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून टाळलेला उल्लेख हा त्याच राजकारणाचा भाग तर नाही ना. याचीच चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगलीय.

Read More