Marathi News> मुंबई
Advertisement

खासगी बसमधून बाईकसह मालाचीही होतेय वाहतूक

'पेट्रोलमुळे कुठलाही अनर्थ होऊ शकतो लोकांचा जीव जाऊ शकतो'

खासगी बसमधून बाईकसह मालाचीही होतेय वाहतूक

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून खासगी प्रवासी बसेसमधून सध्या सगळीकडे सर्रास मालवाहतूक सुरू आहे. या मालवाहतुकीमुळे बस चालकांना चांगला फायदा होतोय. मात्र, प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा सगळा खेळ सुरू आहे... आणि ही सगळी अवैध मालवाहतूक सुरू आहे ती भ्रष्ट आरटीओ अधिकारी आणि दलाल यांच्या आशिर्वादानं...

नवी मुंबईतल्या वाशी इथं ही दृश्यं तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतात. खाजगी बसमध्ये माल भरला जातो आणि त्याची वाहतूक केली जाते. फक्त याच ठिकाणी नाही तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह संपूर्ण राज्यात अशा प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जातो. विशेष म्हणजे, बिनबोभाट ही मालवाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी तर खाजगी बस चालकांनी चक्क गोदामे थाटली आहेत. चक्क लक्झरी बसमध्ये माल भरला आणि उतरवला जातो. मुंबई आणि नवी मुंबईत तर मोठ्या प्रमाणात राज्यातून हा माल येतो. तितक्याच मोठ्या प्रमाणात हा माल बाहेरही जातो. वाहनांचे पाटे, फळे, कडधान्य ते कापड अश्या अनेक वस्तूंची या खाजगी बसेसमधून वाहतूक केली जाते.

सगळ्या प्रकारच्या मालाची वाहतूक यामध्ये केली जाते अनेकदा मोटर बाईकही नेल्या जातात. त्यात असणाऱ्या पेट्रोलमुळे कुठलाही अनर्थ होऊ शकतो लोकांचा जीव जाऊ शकतो, असं खुद्द मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिलीय. 

फक्त प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असताना अशा अवैध पद्धतीने खाजगी बस चालकांकडून माल वाहतूक सुरू आहे. बसेसच्या क्षमतेपेक्षा अनेक टन माल वाहून नेला जातोय. त्यात अर्जंट ब्रेक लावला तर बस वर नियंत्रण राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे अपघातात बसमधल्या प्रवाशांचा जीव जाऊ शकतो. नियमानुसार आरटीओंना अशा प्रकारे मालवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र, या सगळ्याकडे आरटीओ अधिकाऱ्यांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केल जातंय.

अधिकाऱ्यांच्या हफ्तेखोरीमुळे हे प्रकार वाढले आहेत हे प्रकार थांबावे, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे हे जर थांबल नाही तर आम्ही या आर टी ओ च्या भ्रष्ट कारभारा विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत, असं मराठी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुधीर नवले यांनी म्हटलंय. 

या सगळ्या अवैध मालवाहतुकीवर प्रवाशांनीही संताप व्यक्त केला आहे. खासगी बस चालक किलोच्या हिशोबानं मालवाहतुकीचा दर आकारतात. मात्र या गैरप्रकारामुळे प्रवाश्यांचा जीव धोक्यात आहे. प्रवाश्यांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ तत्काळ थांबला पाहिजे. ज्यांच्या आशीर्वादानं ही जीवघेणी वाहतूक सुरू आहे त्या भ्रष्ट आरटीओ अधिकारी आणि दलालांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर प्रशासनाची अनास्था अनेकांच्या जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही. 

Read More