Marathi News> मुंबई
Advertisement

राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी संध्याकाळपर्यंतचा वेळ

काँग्रेसच्या भूमिकेकडे आता लक्ष... 

राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी संध्याकाळपर्यंतचा वेळ

मुंबई : राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. भाजप आणि शिवसेनेला सत्तास्थापनेची संधी देऊन त्यांच्या पदरी अपयश आल्यानंतर आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी संध्याकाळपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा वायबी सेंटरमध्ये आज राष्ट्रवादीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आता राष्ट्रवादीला शिवसेना पाठिंबा देणार का?  मुख्यमंत्रिपदासाठीचा कोणता फॉर्म्युला मान्य होणार ? याबाबत चर्चा रंगत आहेत. तर शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास काँग्रेसला तो मान्य असेल का? मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस काही आडकाठी घालू शकतं का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा पुन्हा एकदा राजकारणाचा खेळातच जाणार आहे...विजयी कोण होणार हे पाहाणं इन्ट्रेस्टिंग ठरणार आहे.

सर्व काँग्रेस नेते मुंबईकडे निघाले आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, पडवी आणि वडेट्टीवार हे दिल्लीतून निघाले आहेत. आता मुंबईत आल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवल्याने दोघे मिळूनच निर्णय घेऊ असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

सोमवारी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रण दिलं होतं. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचं समर्थनाचं पत्र शिवसेनेला मिळालंच नाही. याबाबत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना फोन करुन नाराजी व्यक्त केल्याचं देखील कळतं आहे. पण यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आमदार जयपूरला, मोठे नेते दिल्लीला, त्यामुळे निर्णय़ होऊ शकला नाही. असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Read More