Marathi News> मुंबई
Advertisement

योगी सरकारचा तसा आदेशच नाही, अजित पवार यांचा राज ठाकरेंना टोला

मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी कुणी अल्टिमेटम देण्याची भाषा केली. पण, अशी भाषा कुणी करू नये. कुणी तरी उत्तर प्रदेश सरकारने भोंगे उतरविले त्यावरून काही बोलले. परंतु, उत्तर प्रदेश सरकारने असा कोणताही आदेश काढला नव्हता. 

योगी सरकारचा तसा आदेशच नाही, अजित पवार यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : राज्यात जेवढी धार्मिक स्थळे आहेत त्या सगळ्यांना सुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणाबत जे नियम घालून दिले आहेत ते लागू आहेत. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुठेही स्पीकर, वाद्ये वाजविण्यात सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. हे नियम सगळयांना पाळावेच लागणार आहेत. त्यातून कुणालाही सूट देता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील ज्या धार्मिक स्थळांनी भोंगे लावण्याबाबत अजूनही परवानगी घेतली नाही. त्यांनी आवश्यक ती परवानगी घ्यावी. काही झाले तरी सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आवाजाची मर्यादा पाळावी लागेल. कुणीही कुणाच्याही दबावाला बळी न पडू नये. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी कुणी अल्टिमेटम देण्याची भाषा केली. पण, अशी भाषा कुणी करू नये. कुणी तरी उत्तर प्रदेश सरकारने भोंगे उतरविले त्यावरून काही बोलले. परंतु, उत्तर प्रदेश सरकारने असा कोणताही आदेश काढला नव्हता.

उत्तर प्रदेश संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून अशी माहिती समोर आली की, दिल्ली येथील जहागीरपूर येथे धार्मिक दंगल झाली. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर मठावरील प्रमुखांनी स्वतःहून भोंगे उतरविले.

गोरखपूर मठाची प्रेरणा घेऊन मथुरा येथील श्री कृष्ण जन्मस्थानावरील भोंगे उतरविले गेले. तिथल्या प्रमुखांनी आव्हान केले. पण तसा कोणताही आदेश काढला नाही. येथे भोंगे उतरविण्याचे काम आपणहूनच केले गेले. येथे कोणतीच कायदेशाहीर कारवाई केली नव्हती. येथील पोलीस प्रमुख यांच्यासही संपर्क करून काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण ते ही अधिकृत दुजोरा देत नाहीत.

कुठलेही सरकार कायद्याने, नियमाने आणि संविधानाने चालत असते. अल्टिमेटम दिले. गृहमंत्री यांनी पोलिसांना सूचना दिल्या. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणारे आहेत त्यांना नोटीस देण्यात आल्या. अक्षय तृतीय आणि ईदच्या दिवशी जेवढ्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवता येईल तो ठेवला. कायदा हातात घेण्याची भाषा करणाऱ्याच्या भानगडीत कुणी पडू नये असा इशाराही त्यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता दिला.

कोणत्याही धार्मिक स्थळावर रात्री १० ते सकाळी ६ या काळात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात येणार नाही. ज्यांनी ध्वनीक्षेपक वापरण्याची परवानगी घेतली नाही त्यांनी परवानगी घ्यावी ते आवाहन करत आहोत. सरकारने आवाहन करूनही जर आवश्यक ती परवानगी घेतली नाही तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

कुणी विचारेल की याची आधी अंलबजावणी का केली नाही. ग्रामीण भागात रात्री हरिनाम सप्ताह, जागरण, गोंधळ चालू असतो. शिर्डी संस्थानने सकाळच्या काकड आरती भोंग्याविना सुरु केली. इतके दिवस आम्ही सामोपचाराने घेत कुणालाही अडथळा न होता हे सगळं सुरु होता. पण आता तो निर्णय घ्यावा लागणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Read More