Marathi News> मुंबई
Advertisement

वाहतुकदारांच्या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा

,ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा वाहतुकदारांनी दिलाय. या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिलाय.

वाहतुकदारांच्या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा

मुंबई : महाराष्ट्रामधील वाहतूकदार आज ओव्हरलोड मुळे त्रस्त आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे वाहनचालकाच वाहनांवर नियंत्रण राहत नाही. परिणामी राज्यात दिवसाला कुठे ना कुठे या ओव्हरलोड वाहतुकीचा बळी जातोय. दिवसागणिक हा बळींचा आकडा वाढतोय. रस्ते तर खराब होत आहेत. त्यामुळे वाहतूक ही मंदावतेय. ही जीवघेणी ओव्हरलोड वाहतूक दलाल आणि आरटीओमधील काही बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास सुरू आहे, असा आरोप करण्यात आलाय. दरम्यान,ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा वाहतुकदारांनी दिलाय. या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिलाय.

दरम्यान,  हजारो कोटींचा शासनाचा महसूल हे भ्रष्ट आरटीओ अधिकारी दिवसाला बुडवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रत्येक ओव्हरलोड गाडी मागे या आरटीओमधील काही अधिकाऱ्यांचा हफ्ता बांधला गेला आहे. या सगळ्याचा पर्दाफाश झी 24 तासाने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या यंत्रणानी ओव्हरलोड वाहतुकीविरोधात महाराष्ट्र भर कारवाई सुरू केली होती. मात्र, काही दिवस गेल्या नंतर भ्रष्टाचाराला चटावलेली ही आरटीओमधील काही अधिकाऱ्यांची जमात पुन्हा जागी झाली आहे. काही ठिकाणी तशी चिन्ह ही दिसू लागली आहेत, असा आरोप वाहतूकदारांनी केलाय.

ओव्हरलोड वाहतूक कायमस्वरूपी थांबावी यासाठी वाहतूकदार मराठी कामगार सेनेच्या पुढाकाराने  येत्या ४ जूनपासून आझाद मैदान इथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठींबा जाहीर केला आहे. उपोषण आणि आंदोलनाने हा प्रश्न सुटला नाहीतर जीवघेणी ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला आहे.

Read More