Marathi News> मुंबई
Advertisement

"जो उखाडना है, उखाड लो," टॅक्सी चालकाने महिला कॉन्स्टेबलच्या तोंडावर फेकलं Licence; नंतर पुढे...

Crime News: आरोपी टॅक्सी चालकाने (Taxi Driver) ‘नो एंट्री’ लेनमध्ये गाडी घातल्याचा आरोप केला असला तरी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं न्यायाधीशांनी नमूद केलं आहे.   

Crime News: नो एंट्रीमध्ये गाडी घातल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने रोखल्याने टॅक्सी चालकाने तिच्याशी वाद घालत आपलं लायसन्स तिच्या तोंडावर फेकून दिलं होतं. 'जे करायचं असेल ते कर' असं म्हणत त्याने आपली टॅक्सी पळवली होती. 2015 मधील ही घटना असून टॅक्सी चालकावर जाणुनबुजून दुखापत केल्याबद्दल आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारी पद्धतीचा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, 8 वर्षांनी मुंबईच्या सत्र न्यायालयाने या टॅक्सी चालकाची निर्दोष सुटका केली आहे.

नेमकं काय झालं होतं? 

महिला पोलीस नाईक सेजल मालवणकर 4 मे 2015 रोजी मुंबईच्या सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर कर्तव्यावर तैनात होत्या. संध्याकाळी 5.30 वाजता वाहतुकीचं नियंत्रण करत असताना एक कार 'नो एंट्री'मध्ये घुसली होती. सेजल मालवणकर यांनी या चालकाला रोखलं आणि परवाना दाखवण्याची मागणी केली. मात्र चालकाने कोणतीही कागदपत्रं दाखवण्यास नकार दिला. पण जेव्हा सेजल यांनी त्याच्याकडे आग्रह धरला तेव्हा त्याने परवाना त्यांच्याकडे फेकला आणि 'जो उखाडना है, उखाड लो' असं म्हणत गाडी पळवत नेली. 

सेजल मालवणकर यांनी पोलीस स्थानक गाठलं आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी परवानाच्या आधारे आरोपीची माहिती मिळवत त्याला अटक केली. सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याने याप्रकरणी तपास करत चार्जशीट दाखल करण्यात आली. घटनास्थळी उपस्थित असलेला आयआरसीटीसी चालक, पोलीस हवालदार आणि पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर यांनी या घटनेची पुष्टी केली होती.

दरम्यान मुंबईच्या सत्र न्यायालयाने न्यायाधीश युएम पडवाड यांनी सर्व पुरावे पडताळ्यानंतर म्हटलं की, "आरोपीच्या कृत्यामुळे मालवणकर यांना सरकारी सेवक म्हणून कर्तव्य बजावताना काही अडथळे आले किंवा त्यांना कर्तव्यात सातत्य राखण्यापासून परावृत्त करण्यात आल्याचं या पुराव्यातून स्पष्ट होत नाही आहे".

"आरोपीचे संपूर्ण कृत्य सेजल मालवणकर यांची अवहेलना किंवा अनादर करणार असल्याचं दर्शवतं. परंतु या कृत्यातून मालवणकर यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला किंवा त्यांनी कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्याचा हेतू होता असं म्हणता येणार नाही," असंही न्यायाधीशांनी नमूद केलं. 

टॅक्सी चालकाने सेजल मालवणकर यांची परवाना आणि कागदपत्रं दाखविण्याची मागणी पूर्ण करणं अपेक्षित असलं तरी, त्यांनी तसं करण्यास नकार देणं हा कलम 353 (लोकसेवकास प्रतिबंध करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळजबरी) नुसार गुन्हा होऊ शकत नाही. 

दरम्यान, न्यायाधीशांनी यावेळी आरोपी नो एंट्री लेनमध्ये गाडी चालवत असतानाही त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली नसल्याचं निरीक्षण नोंदवलं. कारवाई का करत आली नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पोलीस कर्मचारी असणाऱ्या मालवणकरांनी गुन्हेगाराला सोडून देणं अपेक्षित नव्हतं असं कोर्टाने सांगितलं. 

Read More