Marathi News> मुंबई
Advertisement

राज्यातलं सरकार ५ वर्ष पूर्ण करणार - संजय राऊत

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करणार, असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं 

राज्यातलं सरकार ५ वर्ष पूर्ण करणार - संजय राऊत

मुंबई  : राज्यातलं महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करणार, असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा थंडावणार आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चेला ऊत आला होता. तसेच निवडणुका कधी घ्यायच्या हे निवडणूक आयुक्त ठरवतात, चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवडणूक आयोगाने एखादी जबाबदारी दिली असेल तर माहित नाही, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत दादांना लगावला आहे. एवढंच नाही तर चंद्रकांतदादा नेहमी सकात्मक बोलत असतात. चंद्रकांतदादा यांनी म्हटल्याप्रमाणे हे सरकार ५ वर्ष चालणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, राजकीय पक्षात संवाद असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ज्या अर्थाने बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे.  त्यावरून राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचं कार्य वाढत आहे. राज्यापुढे अनेक प्रश्न असतात, अशावेळी राजकीय पक्षात संवाद असला पाहिजे, असा हा संवाद होता, या भेटीनंतर कुणीही नाराज होत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बिहार निवडणुकीबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. बिहारमध्ये शिवसेना कायम काही जागा लढवत असते, तेथील शिवसेना उमेदवारांना चांगला प्रतिसाद उमेदवारांचा मिळत असेल, तर ते योग्य आहे, कारण अनेक कार्य़कर्ते वर्षानुवर्ष तेथे शिवसेनेसाठी काम करतायत.

कंगना राणौतने आपल्यावर ट्ववीटच्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे, या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, कंगना राणौत या तरूण आहेत, तरूणांनी राग व्यक्त केला पाहिजे, तरूणांनी राग व्यक्त करणे हे सजगपणाचे लक्षण आहे, पण राग व्यक्त करताना त्यात विकृती नको, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.

तसेच महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर, महाराष्ट्र अस्मितेसाठी लढणारा सामान्य कार्यकर्ता हे बाळकडू आमच्या नेत्यांकडून आम्हाला मिळालं आहे, आणि आम्ही लढणार, महाराष्ट्राची बदनामी आम्ही सहन करणार नाहीत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Read More