Marathi News> मुंबई
Advertisement

महाराष्ट्रातील रस्त्यांवर लालपरी पुन्हा धावली

सुरक्षित अंतर ठेवून एसटीच्या दोन हजारावर फेऱ्या

महाराष्ट्रातील रस्त्यांवर लालपरी पुन्हा धावली

मुंबई :  कोरोना लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने बंद असलेली राज्य परिवहन महामंडळाची म्हणजे एसटीची सेवा आज शुक्रवारी पुन्हा सुरु झाली. महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या लालपरीने आज सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळत अर्थात सुरक्षित अंतर ठेवून प्रवास सुरु केला आणि दिवसभरात दोन हजारावर फेऱ्यांमधून अकरा हजारांवर प्रवाशांनी प्रवासही केला.  

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन महिने संपूर्ण महाराष्ट्रात  बंद असलेले एसटीचे " चाक "आज पुन्हा धावू लागले. राज्य शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता एसटी महामंडळाच्या ३१ विभागांनी आज सकाळी सात वाजल्यापासून एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या. दिवसभरात ४५७ निवडक मार्गावर  एसटीच्या २००७ फेऱ्या मधून ११ हजार १५१ प्रवाशांनी सोशल डिस्टंन्सिंग राखत प्रवास केला. गाव ते तालुका, गाव ते जिल्ह्याचे ठिकाण, तालुक्यापासून जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत अशा अनेक फेऱ्या आज दिवसभरात धावल्या. श्रमिक मजूर, छोटी शेतकरी, सरकारी कर्मचारी अशा अनेक लोकांनी सोशल डिस्टंनसिंग  पाळत एसटीमधून प्रवास केला. आपली लाडकी ‘एसटी’ आज पुन्हा रस्त्यावर धावू लागल्यामुळे सर्व सामान्य जनतेने आनंद व्यक्त केला.

दरम्यान, प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीने आता मालवाहतूकही सुरु करून नव्या पर्वाला प्रारंभ केला आहे.

Read More