Marathi News> मुंबई
Advertisement

युतीमधील वाद मिटविण्यासाठी उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री यांच्यात बैठक

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या महत्त्वाची बैठक झाली.

युतीमधील वाद मिटविण्यासाठी उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री यांच्यात बैठक

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या महत्त्वाची बैठक संपली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली. शिवसेना भाजपमधल्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामधलें उरले सुरले वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. या बैठकीला सेना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. पुढच्या दोन - चार दिवसांत शिवसेना भाजपच्या संयुक्त सभा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यात विविध ठिकाणी सुरू होणार आहेत. त्याआधी काही ठिकाणी असलेले वाद मिटवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. यानिमित्ताने राज्यातील चार टप्प्यातील निवडणूक प्रचाराची रणनीतीवरही चर्चा झाली.

विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांचा प्रचार कोल्हापुरातून सुरु करण्यात आला. त्याआधी सेना - भाजप युतीच्या प्रमुखांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. प्रथम उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, दीपक केसरकर, आमदार राजेश क्षीरसागर हे दक्षिण दरवाज्यातून दर्शनासाठी आले. त्यानंतर लगेलच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हेदेखील मंदिरात आले. सर्वांनी एकत्रितपणे देवीचे दर्शन घेतले. असे असले तरी युतीमध्ये थोडी धुसफूस सुरुच आहे. जागांची अदलाबदल करण्यात आली आहे. मात्र, आजही युतीमध्ये सख्य दिसून येत नाही. त्यामुळे थोडा जरी फटका बसला तरी युतीच्या येणाऱ्या जागा हातातून जाऊ शकतात. त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून दोन्ही पक्ष प्रमुखांनी बैठक घेतली. यात विचारविनिमय करण्यात आला. सातारा आणि पालघरमध्ये भाजपच्या नेत्यांना चक्क शिवसेनेने पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. या दोन जागांवरील प्रश्न सुटला असला तरी तेथील कार्यकर्ते संभ्रमणात आहेत. काही ठिकाणी भाजपचे नेतेही नाराज आहेत. त्यामुळे या वाद भविष्यात डोकेदुखी होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

Read More