Marathi News> मुंबई
Advertisement

मातोश्रीवर शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक; 'या' दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यात आल्याचे समजते. 

मातोश्रीवर शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक; 'या' दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या सुप्त तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दोन्ही पक्षाच्या बड्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवर दाखल झाले. यानंतर जितेंद्र आव्हाडदेखील मातोश्रीवर पोहोचले. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई मातोश्रीवरील बैठकीला उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांच्या बदल्या; मातोश्रीवर पोलीस आयुक्तांची कानउघडणी 

यावेळी राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यात आल्याचे समजते. सुरुवातीला शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या गोंधळाबाबत चर्चा केली. या चर्चेत अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांबाबत स्पष्टीकरण दिल्याचे समजते. 

सरकारमध्ये तीन-चार मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद- राणे

याशिवाय, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा झाली. या चर्चेत एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून थोड्याचवेळात उपमुख्यमंत्री अजित पवार मातोश्रीवर पोहोचणार असल्याचे समजते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शरद पवार, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड मातोश्रीवरून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता पारनेरमधील मुद्द्यावर अजित पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार असल्याचे समजते. 

आज सकाळपासूनच विरोधकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुप्त संघर्षाचा मुद्दा उचलून धरला होता. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. गृहमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना ही माहिती द्यायला हवी होती, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारच्या स्थैर्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. 

Read More