Marathi News> मुंबई
Advertisement

संजय राऊत यांचा टोला : वाह रे वा यांचं परिवर्तन.. योगी... भोगी?

उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे जे काही पालन करायचे आहे ते करण्यात आले आहे. 

संजय राऊत यांचा टोला : वाह रे वा यांचं परिवर्तन.. योगी... भोगी?

मुंबई : जगात कोणताही धर्म जर अकारण हिंसेचा मार्ग अवलंबत असेल तर तो धर्म आणि समाज अधोगतीला जातो, हे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचे स्वागत करायला हवे. आपल्याच देशांमध्ये त्यांनी याचे मंथन आणि चिंतन सुरु करायला हवे, असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भागवत यांना लगावला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( Sharad pawar ) यांची भूमिका राष्ट्रव्यापी आहे. देशात ज्याप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. त्याच प्रकारे देशद्रोही 124a या कलमाचाही गैरवापर होत आहे. अगदी दिल्लीपासून जेएनयुपासून, उत्तर प्रदेश सरकार आसाम पाणी, महाराष्ट्रात भीमा कोरेगाव दंगली नंतर ज्या लोकांवर हा गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात देखील देशात चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रातील एका दाम्पत्याने महाराष्ट्रात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कारस्थान केले होते. त्याला एका राजकीय पक्षाचे पाठबळ होते. हे करण्यासाठी अंडरवर्ल्डचा, परदेशातील संस्थांचा किंवा अतिरेकी संघटनांचा काही हात आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जी कलमे लावली आहेत यावर वाद होऊ नये, असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात अनेक सभा होत असतात. आम्हीदेखील सभा घेतो. त्या दिवशी महाराष्ट्रात अनेक सभा आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतील. त्याबद्दल मला माहित नाही.

उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे जे काही पालन करायचे आहे ते करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या आदेशाचे पालन महाराष्ट्रात करावे ही सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकारने नेहमीच कोर्टाच्या आदेशाचे पालन केले आहे.

आता योगी कोण आणि भोगी कोण, या संदर्भात कुणाचे मत परिवर्तन कसे झाले, हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्याला पीएचडी करायची असेल तर त्याने ती करावी, असा टोला त्यांनी राज ठाकरे ( Raj Thakarey ) यांचे नाव न घेता लगावला. 

Read More