Marathi News> मुंबई
Advertisement

Saki Naka Rape Case : अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, कुटुंबाला 20 लाख रुपयांची मदत

मुंबईतील साकीनाका परिसरात दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील निर्भयासारखा धक्कादायक प्रकार घडला होता

Saki Naka Rape Case : अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, कुटुंबाला 20 लाख रुपयांची मदत

मुंबई : मुंबईतील साकीनाका (Saki Naka Rape Case) परिसरात दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील निर्भयासारखा (Nirbhaya) धक्कादायक प्रकार घडला होता. एका महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार उघडकीस आला होता. गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

याप्रकरणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलीस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (mumbai police commissioner hemant nagrale) यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासाची माहिती दिली.

आरोपीविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा

सोशल मीडियावर अंदाज बांधून काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यामुळे खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माहिती देतोय, असं आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केलं. आरोपीविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत कोठडी देण्यात आल्याची माहिती हेमंत नगराळे यांनी दिली. तसंच पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आणि शासनाच्या विविध योजनांमधून 20 लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे, घटनास्थळावर महिला आणि आरोपी केव्हा आले, गुन्हा केव्हा घडला, हे सारं तपासलं जात आहे, यात पुरावे मिळाले आहेत, हत्यारही जप्त करण्यात आलं असल्याचं हेमंत नगराळे यांनी म्हटलं आहे. आतड्यांना मार लागल्यामुळे पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालंय. पीडित महिला आणि आरोपी 4 ते 5 वेळा भेटले होते. अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली..

विशेष वकिलांची नेमणूक

हा संवेदनशील गुन्हा असल्याने विशेष वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत, असं नगराळे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत आहे तेवढी मदत केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली.

Read More